घाटनांदूर (रिपोर्टर): घरातून दळण दळून आणण्यासाठी पिठाच्या गिरणीकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीस रस्त्यात अडवून तिला एका घरात खेचत नेत मारहाण करत एका नराधमाने दोन वेळेस सदरील मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुलीसह नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. रात्री उशिरा त्या नराधमावर बाललैंगिक अत्याचार व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या अत्याचाराच्या घटनेने अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई तालुक्यातील एका गावामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान घरातून दळण आणण्यासाठी गिरणीकडे निघाली होती. रस्त्यात अचानक तिला रामेश्वर नारायण भंडे याने अडवले. बळजबरीने मुलीला घरात ओढून नेले. त्याठिकाणी सदरील मुलीस मारहाण केली, दाबदडप केली व दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे संबंधित पिडित मुलीने आपल्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर पिडित मुलगी थेट अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात डेरेदाखल झाली. रात्री बारानंतर संबंधित अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश शिंदे हे करीत आहेत.







