
बीड (रिपोर्टर): अकरावीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थिनीला कॅबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणारा उमाकिरण शिक्षण संकुलसह अन्य शिक्षण संस्थांचा संचालक विजय पवारसह त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर या दोघांना रात्री मांजरसुंबा परिसरामध्ये पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. ते पुण्याकडे जाण्यासाठी निघाले असल्याचे सांगितले जाते. आज दुपारी या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सदरच्या घटनेने पालक वर्गात प्रचंड संतापाची लाट असल्याने न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बीड शहरातील उमाकिरण शिक्षण संकुलचा संचालक तथा प्रोफेशनल आणि ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलचा सर्वेसर्वा विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर या दोघांनी इयत्ता अकरावीत शिकणार्या विद्यार्थीनीला कॅबिनमध्ये नेत तिचा लैंगिक छळ केला. सदरील विद्यार्थीनीचे नग्न फोटो काढले, बॅड टच केला अशा आशयाच्या तक्रारीवरून या दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा गेल्या चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून शिक्षण क्षेत्राला बाजारु स्वरुप आणणारा आणि गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा पवार साथीदारासह फरार होता. या घटनेने पालक वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. सामाजीक संघटनांनी आंदोलने सुरू केली होती. उद्या सोमवार रोजी बीड बंदचे आवाहन करण्यात आले होते.

त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी अधिक सतर्कता बाळगत तीनपेक्षा अधिक पथके या आरोपींच्या शोधासाठी पाठवले होते. रात्री हे दोघेही पुण्याकडे रवाना होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. विजय पवार हा नगर जिल्ह्यातून मांजरसुंबा परिसरात येणार असल्याचे आणि प्रशांत हा बीड जिल्ह्यातच कुठेतरी लपून बसल्याचे व तो मांजरसुंबा परिसरातून एकत्रीत होत पुण्याकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार त्यांनी रात्री सापळा रचून या दोघांना जेरबंद केले. आलिशान गाडीमध्ये पवार हा आला होता. ती गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. आज दुपारनंतर या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.त यादृष्टीने बीड न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.






