
बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीत घट
बीड (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अनेक गुन्हे घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र पोलीस अधिक्षक पदाचा पदभार नवनीत कावंत यांनी स्विकारल्यापासून 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये घडलेल्या गुन्ह्यात घट झालेली आहे. त्यात प्रामुख्याने खून होणे, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी आदि गुन्ह्यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. जून 2025 पर्यंत 2024 च्या तुलनेत 7 गुन्ह्याची घट झालेली आहे. 2024 मध्ये एकूण 22 खून झाले होते. तर जून 2025 पर्यंत 15 खूनाचे गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल आहे.
त्याप्रमाणे खूनाचा प्रयत्न करणे, या मध्ये 23 गुन्ह्याची घट झाली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 3 गुन्हे कमी झालेले आहे. तर जबरी चोरी मध्ये 69 टक्के घट झाली आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 गुन्हे कमी आहे. त्या सोबतच अवैध धंदे, जुगार, दारु, गांजा, गुटखा, आदि स्वरुपातही घट दिसून येत आहे. तर एमपीडीए अंतर्गत 12 जणांचे प्रस्ताव दंडाधिकार्यांकडे पाठविले आहे. तर पिस्टलचे लायसन्न पोलीस अधिक्षकाच्या शिफारशीवरुन 340 परवाने जिल्ह्याधिकार्यांनी रद्द केले आहे.दरम्यान माहे 06/2024 अखेर मोक्का अंतर्गत कारवाई निरंक आहे. माहे 6/2025 अखेर जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी 5 मोक्का (एकूण 36 आरोपी) विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी तीन प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.






