
केस करू नको म्हणत, साक्षीदारालाही कात्रीने मारहाण
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली आहे. अलीकडेच, राजकीय वर्चस्वातून होणारे वाद, हाणामारी, खून, अपहरण आणि बेकायदेशीर कामांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीड शहरातील राजदरबार धाब्यासमोर चार युवकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणांमध्ये चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, प्रतीक उर्फ गट्ट्या गायकवाड, मुन्ना कारगुडे, सागर बचुटे, मन्या सर्व रा. इंदिरानगर बीड या आरोपींनी राजू कदम व 19 वर्ष राहणार महाकुंडे वस्ती तळेगाव याच्या कॉलर ला धरून धाब्याचा बाहेर ओढत याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात काचाची बॉटल फोडली व लाकडी दांड्याने मुक्कामार दिला. यामध्ये राजू कदम हा गंभीर जखमी झाल्यानंतर राजू कदमच्या आई, मामी यांनी दवाखान्यात नेले असता आरोपींनी तिथे येऊन सुद्धा तू ऍडमिट होऊ नको, व आमच्यावर केस करू नको असे म्हणताच आरोपी प्रतीक गायकवाड याने त्याच्या हातातील लोखंडी कात्रीने राजू कदम सोबत आलेल्या साक्षीदार राहुल यांच्या डोक्यात मारून त्यालाही गंभीर दुखापत केली. या प्रकरणात चारही आरोपींवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.






