विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण रस्ते कार्यालयात ठिय्या
बीड, (रिपोर्टर)ः- वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळूनही हे काम होत नाही. रस्त्या अभावी मुलांना शाळेत जाण्यास त्रास होतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या चार दिवसापासून मुले रस्ताखराब असल्यामुळे शाळेत गेले नाहीत. रस्ता तात्काळ करावा या मागणीसाठी शिक्षकांसह शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज बीड येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास कार्यालयात ठिय्या मांडला होता.
वडवणी तालुक्यात असलेल्या खडकी देवळा येथील बहुतांश विद्यार्थी महाराणी ताराबाई विद्यालयात शिक्षण घेतात. खडकी देवळा येथील 4 किमी रस्ता गेल्या काही महिन्यापुर्वी मंजूर झाला आहे. हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या वतीने मंजूर झाला मात्र अद्यापही रस्त्याचे काम झाले नाही. रस्त्या अभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसामुळे रस्त्यावरून चालणे मुश्किल होत आहे. गेल्या चार दिवसापासुन मुले शाळेत गेले नाहीत. रस्ता तात्काळ करावा या मागणीसाठी आज शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सदरील कार्यालयात ठिय्या मांडला होता.





