
बीड, (रिपोर्टर)ः- गेल्या 20 वर्षापासून विना अनुदानित शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न लोबकळत आहे. अनेक शाळा या 40 आणि 60 टक्के या अनुदानित टप्प्यावर काम करत आहेत. ज्यांना 40 टक्के आहे त्यांना पुढील टप्पावाढ मिळावी ज्यांना 60 टक्के आहे त्यांना पुढील टप्पावाढ मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी आज शिक्षक संघटनांनी शाळा बंदचा नारा दिला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शाळा बंद असलेल्या दिसून आल्या तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात खाजगी शिक्षण संस्थेच्या एकूण 750 शाळा कार्यरत आहेत. त्या पैकी काही शाळांच्या तुकड्या विना अनुदानित आहेत तर काही ठिकाणी पुर्ण शाळाच टप्पा अनुदानावर आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या शाळांना पुढील टप्पा अनुदान मिळावी यासाठी मराठवाडा शिक्षक संघ, विनाअनुदानित शिक्षक कृती समिती व इतर शिक्षक संघटनांनी आज शाळा बंदचा नारा दिला होता. त्या अनुषंगाने शहरी भागातील शाळा बंद दिसल्या तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळा चालू होत्या. काही ठिकाणी शाळेत मुले आली होती तर शाळेत शिक्षक नव्हती तर काही ठिकाणी आलेल्या मुलांना शिक्षकांनी दोन तास घेवून परत पाठवून दिले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शाळा बंद आंदोलनाला समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. राज्यसरकारने निवडणुकीच्या अगोदर 40 आणि 60 या दोन्ही टप्पावाढ शाळांना पुढील टप्पा वाढ करू असे आदेश काढले होते. मात्र त्या आदेशाला धरून अर्थसंकल्पात या टप्पावाढीसाठी तरतुर केली नाही म्हणून आजचे हे आंदोलन होते.






