मलेरिया विभागातील 18 कर्मचार्यांना अंधारेंनी सेवेतून काढून टाकले-कॉ.नामदेव चव्हाण
बीड, (रिपोर्टर)ः- बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार निता अंधारे यांनी स्विकारल्यापासून त्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. 2 जून 2025 रोजी नगर पालिकेच्या अधिनिस्त असलेल्या मलेरिया विभागातील 18 कर्मचार्यांना 30 महिन्यांचे वेतन तर सोडा मात्र त्यांना सरकारची कोणतेही आदेश नसतांना चक्क शासन सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे या कर्मचार्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या या गलथान कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशीची मागणी कॉ.नामदेव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
बशीरगंज भागातील भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कॉ.चव्हाण बोलत होते. या पत्रकार परिषदेला सेतेतून कमी केलेले 18 कर्मचारीही उपस्थित होते.
वरील 18 कर्मचारी हे सलग 25 ते 26 वर्षापासून अनुकंपा तत्वाद्वारे सेवेत कायम स्वरूपी रूजू झालेले आहेत. त्यातील काहींच्या सेवा या 41 वर्षे तर काहींच्या सेवा या 18 ते 20 वर्षे झालेले आहेत. या कर्मचार्यांना डिसेंबर 2022 पासून त्यांचे नियमित वेतन निता अंधारे यांनी न काढल्यामुळे हे सर्व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून कर्जबाजारीपणा व उपासमारीला तोंड देत आहेत. 1979 मध्ये नगरविकास आणि आरोग्य विभाग यांचे एकत्रित मंत्रालय आहे. मलेरिया निर्मुलनाचा कार्यक्रम नगर पालिकेने हाती घेतल्यानंतर बीड नगर पालिकेने सभागृहात ठराव घेवून 116 पदांची भरती केली होती.
त्यापैकी 98 कर्मचारी हे मयत आणि सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवा व्यप्तगत झाल्यामुळे आता 18 कर्मचारी सेवेत आहेत. या कर्मचार्यांना गेल्या चार वर्षापासून नगर विकास विभागात सामावून घ्यावे यासाठी तीन ते चार वर्षापासून तत्कालीन मुख्याधिकार्यापासून ते निता अंधारे यांच्यापर्यंत सर्वांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याऐवजी वेतन मागितले म्हणून या 18 कर्मचार्यांना अंधारे यांनी राज्य सरकारचे कोणतेही आदेश नसतांना सरळ सेवेतून कमी केले आहे. यातील 18 कर्मचार्यांपैकी बहुतांश कर्मचारही हे अनुसुचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाचे आहेत. त्यांना सेवेतून कमी केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे तात्काळ या कर्मचार्यांना सेवेत घ्यावे आणि त्यांचे राहिलेले 30 महिन्याचे वेतन देण्यात यावे आणि अंधारे यांच्या तुघलकी कारभाराची चौकशी करावी अशी मागणी शेवटी कॉ.नामदेव चव्हाण यांनी केली.








