अंत्यसंस्कारा वेळी बाळाने टाहो फोडला
अंबाजोगाईच्या स्वारातीचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर
बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू, डॉक्टरांबाबत पालकांची तक्रार नाही, माध्यमात चर्चा होताच चौकशीच्या हालचाली
बीड (रिपोर्टर): महिलेची प्रसुती झाल्यानंतर जन्माला आलेल्या बाळाने कुठलीही हालचाल केली नाही अथवा ते रडलं नाही, म्हणून डॉक्टरांनी सदरचे बाळ मृत असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तेव्हा ते बाळ घेऊन नातेवाईक आपल्या गावी गेले, अंत्यसंस्काराची तयारी केली परंतु ती तयारी सुरू असतानाच बाळ रडू लागले. नातेवाईकांनी पुन्हा बाळाला त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या बाळावर उपचार सुरू आहेत. सदरचा प्रकार हा अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घडल्याचे उघडकीस आले आहे. डॉक्टराचा निष्काळजीपणा यातून स्पष्टपणे जाणवत आहे. डॉक्टरांबाबत नातेवाईकांची अद्याप कुठलीही तक्रार नसली तरी माध्यमांमधून जेव्हा सदरचा प्रकार समोर आला तेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, जिल्हाभरातल्या शासकीय रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांच्या हेळसांडीबाबत सातत्याने तक्रारी येत असताना अंबाजोगाईच्या शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबियातील महिला गरोदर असल्याने बाळांतपणासाठी तिला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. महिलेची प्रसुती झाली, बाळ जन्माला आले मात्र जन्मलेल्या बाळाच्या हालचाली नव्हत्या. बाळ रडत नव्हतं, अशा वेळी डॉक्टरांनी संबंधित कुटुंबियाला बाळ मृत असल्याचे सांगितले. तेव्हा नातेवाईक बाळाला घेऊन गावी पोहचले. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली, मात्र त्याचवेळी बाळ रडू लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ पुन्हा बाळाला त्याच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये आणले.
सध्या हे बाळ अतिदक्षता कक्षेत दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जिवंत बाळाला मृत घोषीत करणारे डॉक्टर, त्यांचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत कुटुंबियांची डॉक्टरबाबत कुठलीही तक्रार नाही. मात्र या घटनेची जोरदार चर्चा होत असून रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि बेजबाबदार वर्तनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. आज दुपारपर्यंत या प्रकरणी कुणावरही कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र माध्यमातून हा प्रकार समोर आल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासनाने चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.









