
तिघा जणांविरोधात केले गुन्हे दाखल
बीड (रिपोर्टर): वैयक्तिक वादातून खोट्या तक्रारी सर्रासपणे केल्या जात असतात. बीड जिल्ह्यात तीन खोट्या तक्रारी पोलीस प्रशासनाने उघडकीस आणल्या. खोट्या तक्रारी करणार्यांविरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.
केज तालुक्यातील तरनळी येथील अंगद अनंत खेडकर याने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती की, साखर कारखान्याची ऊसतोडणीची उचल घेऊन मोटारसायकलवर जात असताना तिघा जणांनी पाठलाग करून 1 लाख 75 हजार रुपये हिसकावून घेतले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविंरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास केला असता हा प्रकार खोटा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीसांनी अनंत खेडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दुसरा प्रकार अंबाजोगाई शहरात उघडकीस आला. विठ्ठल श्रीहरी माळी (रा. मोरेवाडी) याने अंबाजोगाई पोलिसांना 112 वरून माहिती दिली होती की, धोंडीराम अण्णा चव्हाण व बरकते यांनी अपहरण करून आपणास मारहाण करून पाय मोडला तसेच एका खोलीत डांबून ठेवले. सदरील या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक काँवत यांना झाल्यानंतर काँवत यांनी याची दखल घेत अपहृत व्यक्तीची सुटका करण्यासाठी धारूर पोलिसांना कळविले हातेे. त्यानंतर पोलीस धारूर येथे दाखल झाले. मात्र हा प्रकार बनवाबनवीचा असल्याचे निदर्शनास आल्यनांतर पोलिसांनी विठ्ठल माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तिसरा खोटा प्रकार हा आष्टी पोलिसात घडला. सानप शास्त्री भोसले (रा. शेरी ता. आष्टी) हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता. याची दखल आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यानीं घेतली होती. भुतेकर यांनी भोसले यास फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलवले मात्र आता आपणास तक्रार द्यायची नाही, आपण मिटवून घेतलं, असे भोसले म्हणाला असता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या तिन्ही घटना बनवाबनवीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी बनवाबनवी करणार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.








