
धन्य ते सरकार! दिले 40 लाख
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 575 कोटींचा नियोजीत आराखडा तयार करून त्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या मंजुरीला तब्बल सहा महिने उलटून गेले, अखेर राज्य सरकारने मोठे मन करून बीडच्या विकासासाठी 40 लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. जय हो फडणवीस सरकार, असं म्हणण्याची वेळ आता बीडकरांवर आली आहे.
सामाजिक, आर्थिक यासह विविध विकास कामांमध्ये मागास म्हणून ओळखल्या जाणार्या बीड जिल्ह्यात लोकांच्या मुलभूत गरजांसाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या नियोजन समितीच्या बैठकीत 575 कोटींच्या विविध विकास कामांसाठी नियोजीत आराखडा तयार करण्यात आला अणि तो मंजूरही करण्यात आला. सहा महिन्यांपासून हे बजेट येईल आणि बीड जिल्ह्यातले विविध विकास कामे सुरु होतील, अशी आशा येथील सर्वसामान्यांना होती, मात्र आज राज्य सरकारने मोठं मन करत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी 40 लाख रुपये दिले. सदरचा चाळीस लाख रुपयांचा निधी हा विमान प्राधिकरणाकडे जाणार आहे.
या 40 लाख रुपयांच्या निधीतून बीड येथे जी विमान धावपट्टी उभारण्यात येणार आहे त्या विमान प्राधीकरणाकडून सर्वे करणे आणि त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे यासाठी हा 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला वित्त विभागाने दिलेले आहेत. उर्वरित निधीबाबत सर्वच विभागांची अंदाजपत्रके हे कमीत कमी 15 लाखांपासून पुढे करण्याचे सांगितलेले आहे. जिल्हा नियोजन विकास समितीतून जी कामे होणार आहेत ती सर्व कामे ई टेंडरद्वारेच करण्यासाठी पंधरा लाखांच्या पुढे आराखडे बनवावेत, असेही जिल्हा प्रशासनाला राज्याच्या वित्त विभागाने सूचविलेले आहे. नुकतेच आज राज्याचे पावसाळी अधिवेशन संपत असून त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या अनुषंगाने वित्तर विभाग किंवा पालकमंत्री निर्णय घेतील, असेही प्रशासनाने सांगितले.








