बीडसाठी हवे 300 कोटी रूपये
बीड, (रिपोर्टर)ः- ग्रामीण भागातील प्रत्येक नागरीकांना स्वच्छ पाणी मिळावे या दृष्टी कोनातून जलजीवन ही योजना सुरू करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविली जाते. प्रत्येक गावात योजनेची कामे सुरू असून ही कामे निधी अभावी अर्धवट आहेत. बीड जि.प.साठी 300 कोटी तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी 83 कोटींची गरज आहे. हे पैसे आल्यानंतरच कामे मार्गी लागू शकतात. दरम्यान काही कामात अनियमितता आढळुन आल्यानंतर त्या कामाच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या.
राज्यभरामध्ये जलजीवन ही योजना राबविली जाते. गेल्या काही महिन्यापासून योजनेची कामे सुरू आहेत. प्रत्येक गावामध्ये ही योजना राबविली जात असल्याने काही गावात 50 तर काही गावात 60 ते 70 टक्के कामे झाली आहेत. मात्र कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने कामे ठप्प झाली आहेत. कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला मात्र अद्यापपर्यंत निधी मिळालेला नाही. जिल्ह्यातील अनेक गावात कामासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी बोगसपणा आढळुन आल्यानंतर संबंधित गुत्तेदाराविरूध्द कारवाया देखिल करण्यात आल्या होत्या. जी कामे चांगली आहेत. त्यांच्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदसाठी तीनशे कोटी तर महाराष्ट्र जिवन प्राधिकरणासाठी 83 कोटींची गरज आहे. हे पैसे कधी मिळणार? पैसे मिळाल्यानंतच जलजीवनच्या पुढील कामाला गती मिळू शकते. सध्या तरी हे कामे ठप्प आहेत.








