
वाळू माफियाची हर्सूल कारागृहात रवानगी
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या विविध गुन्हेगारीच्या घटनाक्रमाने अवघ्या राज्यात जिल्ह्याची बदनामी होत असताना आता पोलीस अधिक्षक नवनीत काँवत हे अॅक्शन मोडवर येत गुन्हेगारी जगताचा कर्दनकाळ होताना दिसून येत आहेत. गुटखा, वाळू यासह अन्य माफियागिरी करणार्यांविरोधात ते थेट अॅक्शन घेत असल्याचे दिसून येते. चकलांबा पोलिसांना विविध गुन्ह्यात हवा असलेला फरारी आरोपी याच्या पैठण तालुक्यात मुसक्या बांधत त्याच्या विरोधात एनपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. सदरचा आरोपी हा वाळू माफिया असून त्याची थेट हर्सूलमध्ये रवानगी केली गेली. या कारवाईने वालू माफियात खळबळ उडाली आहे.

सुरज विठ्ठल ढाकणे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या मुंगी येथील प्रमुख रहिवासी. त्याने अहिल्यानगरसह बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालत अनेक ठिकाणी चोरी, दरोडे, जाळपोळ, खुनाचा प्रयत्न यासह वाळू तस्करीत तो आघाडीवर होता. त्याच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिसात अनेक गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांना तो हवा होता. फरारी सुरज ढाकणे हा मुंगी घाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, डिवायएसपी निरज राजगुरू, शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप पाटील, अनंत तांगडे, सोमनाथ कुलकर्णी, अमोल येडे, कैलास खटाणे, सिध्देश्वर मुरकुटे, अभिमन्यु अवताडे, राहूल शिंदे, विकास राठोड, मनोज परझणे, अशपाक शेख, नितीन वडमारे, बिभीषण चव्हाण यांनी केली.








