
आत्मदहन करण्यासाठी आलेल्या बोरफडीच्या सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले
बीड (रिपोर्टर): बोरफडी येथे 25-15 अंतर्गत कामे करून काही महिने उलटले तरीही उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून कामाचे मोजमाप करण्यात आले नाही. संबंधित अभियंता मोजमाप करण्यास टाळाटाळ करत असल्याने वैतागलेल्या सरपंचाने आत्मदहनाचा इशारा दिला होता. सदरील सरपंच आत्मदहन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असता त्यास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
कैलास नागनाथ घुगे हे बोरफडीचे सरपंच आहेत. त्यांनी गावात ग्रमाविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत 25/15 योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रेट बाकडे बसवण्याचे पाच कामे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी अदांजपत्रकानुसार केले आहेत. या कामाचे मोजमाप घेण्यात आले नाही तसेच त्याचे बीलही तयार करण्यात आले नाही. संबंधित अभियंत्यास मोजमाप करण्यासाठी विनंती केली मात्र ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्रस्त असलेल्या सरपंचाने शेवटी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला होता. आज सरपंच आत्मदहन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले असता त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.







