
नीतांच्या नियतीवर बीडकरांची कैफियत
नाली सफाई नसल्याने उंदराच्या सुसुने बीड तुंबते
अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य
नाल्या सफाईच्या बिलात मात्र भ्रष्टाचाराची चर्चा


बीड (रिपोर्टर): बीड शहराला मायबाप आहे की नाही, शहर अनाथ झालाय का? लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी शहरवासियांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतायत का? ज्या नागरिकांच्या मुलभूत हक्काचे संरक्षण करणे हे नगरपालिकेचे आद्य कर्तव्य असते, त्या नगरपालिकेच्या सीओ कुठल्या धुंदीत आहेत? हे प्रश्न आमचे नव्हे बीडकरांचे आहेत. शहरात साध्या उंदराने सुसु केली तर कुठेही डपके साचते, पाणी साचते, त्यावर मच्छर तयार होतात. डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार वाढतात. मात्र याचे सोयरसुतक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना नाही. पावसाळ्या आधी नाल्यांची सफाई होणे गरजेचे असते, मात्र शहरात नाल्या घाणीने, कचर्याने तुडुंब आहेत. त्या कामावरचे पैसे मात्र उचलल्याचे बोलले जाते. भ्रष्टाचार हा सीओ नीता अंधारेंच्या कार्यकाळात शिष्टाचार झालाय. अशा संतप्त भावना लोकांकडून व्यक्त होत असून थोड्या पावसाने बीड तुडुंब होत असल्याने शहरवासियांना मानसिक, शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नीता अंधारे यांची नियुक्ती झाल्यापासून बीडकरांसह लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनाही ‘आ बैल मुझे मार’ सारखी प्रचिती येत आहे. त्याचे दुरगामी परिणाम बीड शहरवासियांना भोगावे लागत असून भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचे प्रमाणपत्र देत नीता अंधारे यांनी शहरात ‘अंधेर नगरी आणि अंधारे राजा’ हे ध्येय-धोरण आखल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीतून दिसून येते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई होणे नितांत गरजेचे असते. मात्र शहरातल्या बहुतांश नाल्यांची सफाई झाली नाही, त्याचे बील मात्र उचलले गेल्याचे सांगण्यात येते. शहरात साधे उंदराने सुसु केली तर जिकडे तिकडे पाण्याचे डोह साचतात, दुर्गंधी पसरते. असाच काहीसा प्रकार बीडकरांना अनुभवयास मिळत आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी शहरातल्या अनेक भागांमध्ये नालीमधील पाणी रस्त्यावर येते. बराच काळ पाणी रस्त्यावर राहिल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास होतो. शहरात अस्वच्छता जिकडे तिकडे पहावयास मिळत आहे.

याला पुर्णत: जबाबदार मुख्याधिकारी नीता अंधारे या आहेत. शासन आणि प्रशासन व्यवस्थेला त्यांच्याबाबत अनेक तक्रारी मिळाल्या. मात्र अंधारे आणि शहरातला अंधार दूर करण्यात शासन प्रशासन व्यवस्थेला अद्याप तरी यश आले नाही. आजही शहरातल्या विविध भागांमध्ये नाल्यांची सफाई नसल्याने, कचर्याची सफाई नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पहावयास मिळते. परिणामी मलेरिया, डेंग्यू यासह अन्य आजार शहरात वाढत असल्याचेही पहावयास मिळत आहे. शासन-प्रशासन व्यवस्थेने नीता अंधारे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी, त्याचबरोबर अंधारेंच्या अंधारयुक्त राज्यातून बीडकरांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.








