
माजलगाव तालुक्यातील प्रकार
पात्रुड:(रिपोर्टर)माजलगाव तालुक्यात कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या खरीप हंगामात , सोयाबीन,कापूस पिकांना रासायनिक खताची गरज निर्माण झाली. मात्र, काही कृषी केंद्र चालक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असून, जादा दराने खताची विक्री करून शेतक-यांची आर्थिक लूट करीत आहेत.
काही दिवसांपासून माजलगाव तालुक्यातील पात्रुड व परिसरात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून खतांचा काळाबाजार सुरू आहे. वाजवी किंमतीपेक्षा 400 ते 500 रुपये जास्त दराने डीएपी, युरिया व इतर सर्वच खते, औषधे, मनमानीरीतीने विकली जात आहेत. याकडे मात्र कृषी अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. गरजेपोटी शेतकरी जादा दराने खतांची खरेदी करीत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेती करावी की नाही हा मोठा प्रश्न शेतकर्यांना पडला. गेल्या काही वर्षांपासून उत्पादन खर्चानुसार उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच आता ऐन हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा करून शेतकर्याची आर्थिक फसवणूक केली जात आहे. शेतकर्यांची ही आर्थिक लूट कृषी विभागाने थांबवून रासायनिक खत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
———————————
दरवर्षी खरीप हंगामात पिकांना रासायनिक केंद्राकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने खतांची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. कृषी विभागाने शेतकर्यांना मूबलक प्रमाणात खत शासकीय दरात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.








