
अजितदादांचे कृषीमंत्र्यांना खडेबोल, कोकाटेंकडून दिलगीरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर राजीनाम्याची शक्यता
मुंबई (रिपोर्टर): वादाची साडेसाती ओढावून घेणारे राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज सकाळी अर्धातास चर्चा झाली तेव्हा अजित पवारांनी तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, बोलताना भान ठेवायला हवं, किती वेळ माफ करायचं, आता माफी नाही, असे एक ना अनेक नाराजीचे सूर काढत बेजबाबदार वक्तव्ये करणार्या माणिक कोकाटेंचे कान टोचले. त्यानंतर अजित पवार हे मंत्रीमंडळाच्या बैठकीला रवाना झाले. मंत्री मंडळाच्या बैठकीतही कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोकाटेंनी दिलगीरी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील शेतकर्यांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत विदान परिषदेमध्ये ऑनलाईन रम्मी खेळणारे राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत सातत्याने राज्यभरातून मागणी होत होती. अखेर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री कोकाटे यांची भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. तत्पूर्वी नाशिक जिल्ह्यातलं शेतकरी संघटनेचं एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटलं. कोकाटेंना या वेळेस माफ करावं, ते शेतकर्यांचे प्रश्न जानणारे आहेत, असं म्हणत या शिष्टमंडळाने माणिकराव कोकाटे यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी किती वेळा माफ करायचे, बोलताना संयम बाळगायला हवा, जेव्हा मी त्यांना मंत्रीपद दिलं होतं तेव्हा तुम्ही आले होते का? असे एक ना अनेक प्रश्न शिष्टमंडळाला अजित पवारांनी विचारले. त्यानंतर कोकाटे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली तेव्हा अजितदादांनी तुम्हाला किती वेळ समजावयाचे, आम्जही तुम्हाला खूप वेळा सांभाळलं, आता हा विषय खूप पुढे गेला आहे, माणिकरावांकडून सतत चुका हाते आहेत, आता माफी नाही, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना आणि वागताना भान ठेवायला हवे, असे म्हणत कोकाटेंचे कान टोचले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना खडे सवाल विचारत अनेक वेळा माफ केलं, आता माफ करू शकत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं. सरकार भिकारी आहे, असं वक्तव्यही माणिक कोकाटे यांनी मध्यंतरी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी अंगावर घेतली होती. मंत्रीमंडळाची बैंक झाल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.








