
कृषी विभाग शेतकर्यांना कधी पैसे देणार?
बीड (रिपोर्टर): केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी अनुदानाचे राज्यभरात 48 लाख अर्ज पेंडिंगमध्ये पडले असून अद्यापही निकाली काढण्यात आलेले नाहीत. यासाठी 44 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. बीड जिल्ह्यातीलही हजारो शेतकर्यांचे पैसे पेंडिंगमध्ये पडले आहेत. त्यांना पैसे कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुक्ष्मसिंचन, फलोत्पादन, यांत्रीकीकरण, शेततळे, हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांना अनुदान दिले जाते. राज्यात शेतकरी अनुदानासाठी 48 लाख अर्ज आलेले आहेत. हे अर्ज अजूनही निकाली काढण्यात आलेले नाहीत. यासाठी 44 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यांत्रिकीकरणातून 26 लाख तर सुक्ष्मसिंचनासाठी सव्वाचार लाख, फलोत्पादनासाठी साडेसतरा लाख अर्ज आलेले आहेत. शीतगृह, शेततळे, हरितगृह, कांदाचाळ याचेही अर्ज आलेले असून हे सर्व अर्ज धूळखात पडले असून त्याचे पैसे शेतकर्यांना कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत.








