
अण्णाभाऊंसमोर अनुयायी नतमस्तक
बीड (रिपोर्टर): मी साहित्य लिहितो ते मनोरंजनासाठी नव्हे तर माणसाच्या दु:खातून क्रांती उभी करण्यासाठी असं म्हणत अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांसाठी खर्ची घातले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवत न्याय आपला हक्क आहे, हे प्रत्येकाला समजावून सांगण्याबरोबर तो हक्क मिळवण्यासाठी वज्रमूठ आवळण्याचे बळ दिले. आज ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये हजारो अनुयायांनी त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत अण्णाभाऊंचा जयजयकार केला.

बीड शहरातल्या अण्णाभाऊ साठे चौकात आज सकाळपासून अनुयायांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. अण्णाभाऊ साठेंचे विचार आणि त्यांनी समतेपोटी केलेले लिखान आजही क्रांतीकारी दिसून येते. अण्णाभाऊंजवळ अन्यायाची चीड होती, गुलामगिरी विरुद्ध लढण्याची खुमखुमी होती, दु:ख, दैन्य, दारिद्रय याचा नाश करू इच्छिणार्या शुद्धरुपी गोळ्यांचं कोठारच्या कोठार होतं आणि त्यांच्या मानवतावादाच्या तलवारीला समाजवादाची शास्त्रीय पद्धतीने चढलेली धार होती, म्हणून त्यांचा पोवाडा जनमाणसात नुसता रवंथ करण्यासाठी जात नसे तर ठिणग्या ठिणग्यांनी रान उठवित असे, असे शाहीर अमर शेख यांनी म्हटले. आज अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने यामध्ये लोकांनी हजेरी लावली. अण्णाभाऊंच्या विचारांची आणि त्यांच्या साहित्याची आजही तेवढीच गरज असल्याचे सांगत हजारो-लाखो अनुयायी अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले.








