पटणा (रिपोर्टर) बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतलीय. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटणा येथील 1 आणे मार्ग आणि राजभवनची सुरक्षा वाढवण्यात आलीय. खरं तर, सीएम नितीश कुमार 1 आणे मार्गावरील निवासस्थानी जेडीयूच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. बिहारच्या राजकारणासाठी ही बैठक खूप मोठी मानली जात आहे.
नितीश कुमार राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना राज्यपालांनी साडे बारा वाजता भेटीची वेळ दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, 1 आणे मार्गावर जेडीयू आमदार आणि खासदारांची बैठक सुरूय. यादरम्यान कोणत्याही लोकप्रतिनिधीला भ्रमणध्वनी घेऊन सभेला जाऊ दिलं जात नाहीय. सर्वांचे मोबाईल फोन बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, राजभवनाची सुरक्षा व्यवस्थाही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आलीय. आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात जाऊ शकतात, असं सांगण्यात येतंय.
बिहारमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ आणि विविध पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान नव्या सरकारची तयारी जवळपास पूर्ण झालीय. ताज्या अपडेटनुसार, काँग्रेस-डाव्या पक्षांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तेजस्वी यांना सुपूर्द केलंय. पाटणा येथील राबडी निवासस्थानी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत तेजस्वी यांना हे समर्थन पत्र देण्यात आलंय. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आता ते पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे सर्व 16 मंत्री राजभवनात जाऊन राज्यपालांकडं राजीनामे सादर केले आहेत.