
ट्रकचालकाने पोलिसांना कळवले, तरुणाने आत्महत्या का केली? पोलिसांचा शोध सुरू
बीड (रिपोर्टर): पोलीस भरतीची तयारी करणार्या एका 20 वर्षीय तरुणाचा झाडाला लटकलेला मृतदेह ट्रकचालकाने पाहिल्यानंतर याची माहिती तात्काळ 112 ला कॉल करून कळविली असता सदरचा तरुण हा धानोरा येथील गणेश बहिरवाळ असल्याची ओळख पटली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल का उचललं? हे अद्याप समजू शकले नसले तरी ज्या तरुणाने झाडाला फास घेतला त्यावेळी त्याचे पाय बांधलेले दिसून येत आहेत.
याबाबत अधिक असे की, गणेश सतीश बहिरवाळ (वय 20, रा. मंझरी ह.मु. धानोरा) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आज सकाळी तो व्यायामासाठी घराबाहेर पडला होता. मात्र बीड बायपासवरील संभाजी महाराज चौका नजीक असलेल्या शिवाजी नाईकवाडे यांच्या शेतात गणेशचा लटकताना मृतदेह एका ट्रक चालकाने पाहिला. त्याने तात्काळ 112 ला कॉल करून सदरच्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी तात्काळ घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस डेरेदाखल झाले. तेव्हा सदरच्या तरुणाचा मृतदेह झाडाला लटकताना आणि त्याचबरोबर त्याचे पाय बांधलेले पहावयास मिळाले. मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी गणेशचा पार्थीव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दुपारी एक वाजेपर्यंत याबाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. प्रथमदर्शी ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येते. मात्र पाय बांधलेले असल्याने याबाबत शंका उपस्थित केली जात असून गणेशने आत्महत्या केली तर का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.






