बीड, ऑनलाइन रिपोर्टर
दि. २० ऑगस्ट
बीड जिल्ह्यातील न्यायालयीन क्षेत्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना बुधवारी सकाळी समोर आली. वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी. पी. चंदेल (वय अंदाजे ४० वर्षे) यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी साधारण १० वाजताच्या सुमारास न्यायालयीन कर्मचारी व वकील कामकाजासाठी पोहोचले असता, चेंबरमध्ये चंदेल यांचा मृतदेह दिसून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
चंदेल यांची नुकतीच, जानेवारी २०२५ मध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली होती. केवळ सात-आठ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी जीवन संपवल्याने सहकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वडवणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला असून पुढील तपास सुरू आहे.









