
शिरूर कासार (रिपोर्टर): वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज शिरूर कासार येथे जोरदार मोर्चा काढण्यात आला. जिजामाता चौकातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात आला.
प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे, तालुका अध्यक्ष दिलीप माने, नेते चंद्रकांत औसरमल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. शेकडो कार्यकर्त्यांनी भूक नको सत्ता हवी, दलित, बहुजनांच्या हक्कांसाठी लढा अशा घोषणा दत शासनाच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला.

मागण्यांचा प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे: खालापुरी शेतमाळ गटातील दलित, आदिवासी, बहुजन शेतकर्यांना जमीन हक्क पट्टे द्यावेत, तालुक्यातील शेतकर्यांना वीजपुरवठा नियमित करावा, शिरूर कासार तालुक्यातील सर्व रघुकुल लाभार्थ्यांना शासन नियमांप्रमाणे 5 ग्रा. जागा द्यावी, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपूर्ण रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, दलित वस्त्यांतील बोअरवेल कामे त्वरीत करावीत, अपंग, विधवा, वृद्ध यांना पेन्शन तातडीने द्यावी, रोजगार हमी योजनेअंतर्गत योग्य रोजगार उपलब्ध करून द्यावा, शेतकर्यांना पीकविमा तातडीने मंजूर करून मिळकतीचे पैसे वेळेत द्यावेत, दलित, आदिवासी व भटक्या विमुक्तांना नवीन रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे. शिरूर तालुक्यातील भूमिहीन दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांना घरकुल मंजूर करावे. मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.








