
11 धरणात 182 टिएमसी पाणी साठा
बीड, (रिपोर्टर)ः- मे, जुन, जुलै या दरम्यान पडलेल्या पावसात मराठवाड्यातील तलावात पाण्याचा साठा तेवढा जमा झाला नव्हता. 50 टक्क्याच्या आतच तलावात पाण्याचा साठा होता. काही तलाव ही कोरडी होती तर काही तलावातील पाणी जोत्याच्या खाली होते. मात्र गेल्या चार दिवसामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील तलावात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात जमा झाला. 11 मोठ्या तलावात 90 टक्के पाणी साठा म्हणजे 182.79 टिएमसी पाण्याचा साठा जमा झाला असून धरणात पाण्याचा साठा मुबलक झाल्याने मराठवाड्यातील उन्हाळ्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
गेल्या चार दिवसापासून मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाने हाहा कार माजून सोडला. अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या तर काही नद्या आजही वाहत आहेत. मराठवाड्यातील धरणातील पाण्याचा साठा कमी होता. दोन दिवसाच्या पावसाने पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मराठवाड्यात 11 मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पात 90.4 टक्के म्हणजे 182.79 टिएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. जायकवाडी धरणात 94 टक्के, निम्मदुधनात 69 टक्के, एलदरीत 99.59 टक्के, सिध्देश्वर 92.49 टक्के, माजलगाव धरणात 48.91 टक्के, मांजरात 93.73, पैनगंगात 100 टक्के, मनारमध्ये 90.26 टक्के, विष्णुपुरीत 62.82 टक्के तर सिना कोरेगावमध्ये 86.44 टक्के पाण्याचा साठा जमा झाला आहे. धरणात मुबलक साठा जमा झाल्याने मराठवाड्याची उन्हाळ्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.








