बीड : जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात रविवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड असे असून, त्याच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी अनिल चव्हाण याचे नाव पुढे आले असून, घटनेनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.
हत्या झाल्याची माहिती मिळताच परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
दरम्यान, प्रेमसंबंधाच्या संशयातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे रत्ननगर तांडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.










