बीड :
ऑनलाईन रिपोर्टर
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत मोर्चा नेण्याचा निर्धार केलाय. यासाठी बीडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीच्या ठिकाणी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा दिली. यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय परतायचंच नाही. आरक्षण डोक्यावर घेऊन गुलाल उधळूनच परत यायचं अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून मुंबईला यायचं थांबू नका असं आवाहनही स्थानिक नेत्यांना जरांगेनी केला.
मंत्री फी भरणार नाही, लेकराबाळांचं शिक्षण होणार तुमची सत्ता आली म्हणून फुकट नोकऱ्या नाही लागणार. इथं जातीवर संकट आलंय तर तुम्हाला रक्षण करावं लागेल. सरकार मराठ्यांवर संकट आणतेय पण आता मराठा लढणार आहे असंही जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं.
आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आता ही शेवटची फाईट आहे, अशी मारायची की आरक्षण घेऊनच यायचं असं मनोज जरांगे म्हणाले.
बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो.
म्हणाले मनोज जरांगे?
गडबड घोटाळा करु नका. त्यामुळे मराठा समाजावर संकट घोंघावतंय. ते संकट आता मोडून काढायचं आहे. तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करुन घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं. प्रत्येकाने आपला वापर केला. उभ्या पिढ्यांचं वाटोळं झालं. यापुढे आपण विचारांनी चालायचं. बीडमधील मराठा समाज आता एक झाला आहे, गर्व वाटेल असं काम करतोय. आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत. आता असंच मुंबईला जायचं.
मुंडेंचे मारेकऱ्यांना धरा
बीडच्या सभेमध्ये पोलिसांनी डीजे वाजवू दिला नाही. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, आपल्याला बीडच्या सभेत डीजे वाजवू दिला नाही, ठीक आहे. पण आमचा डीजे वाजवू दिला नाही, यापुढे बीडमध्ये कुणाचाही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. देवेंद्र फडणवीसनी जर पोलिसांना आदेश दिले असतील आणि पोलीस जर चुकीचे काम करत असतील तर तसं करू नका. एवढी विनंती करुनही जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला काही करायचं असेल तर त्या महादेव मुंडेच्या मारेकऱ्यांना शोधा.
आमदार तुमचा म्हणून पोरांची फी माफ होणार नाही
मनोज जरांगे म्हणाले की, तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावं. कुणा राजकीय नेत्याचं ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला यायला सांगा. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा. आता ही शेवटची लढाई असेल
पहिली भूमिका
मुंबईला सर्वांनी शांततेत जायचं. आपल्या शेजारी जरी कुणी तसं वागत असेल तर एकानेही पळायचं नाही. त्याला उचलायचा आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ करणारे आपली पैदास नाही लक्षात ठेवा. सरकारनेच षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा करायला लावतील. आपल्याला खूश करण्यासाठी घोषणा देतील आणि त्यांचेच लोक फडणवीस देत नाहीत असं म्हणून दगडं हाणा म्हणतील. ते म्हणू शकतात, त्यामुळे आपल्यापासून पाच फुटावर दगडफेक झाली तरी सरळ चालायचं मुंबईच्या दिशेने.
भूमिका दुसरी
बीडमधल्या प्रत्येक माणसानं घरी रहायचं नाही. मायबापहो शेवटची फाइट आहे. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलाल उधळायचा. मागं फिरायचं नाही. बस झालं आता, कंटाळा आला. उपोषण करून करून फेस पडला. शेवट फाइट आता. सोडायचं नाही मैदान.
तिसरी भूमिका
बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना फोन लावायचे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, स्थानिक प्रतिनिधी, भावी नेत्यांनाही सांगायचं चला मुंबईला. यातले भावी अर्धे सोडून गेले. ते आपल्या पुढे जाणारेत. पण बाकीच्यांना सांगा फक्त मुंबईला चला.
चौथं महत्त्वाचं काम
डॉक्टर, वकील, गुरुजी, श्रीमंत, नेते यांना सांगा गाड्या बाहेर काढा. जितका कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी मुंबईला चला. लेकरांचे हाल चाललेत.






