गणेश सावंत/9422742810
माथ्यावर टिळा, मनगटावर बांधलेला भगवा दोरा, गळ्यात भगवा गमजा म्हटलं की तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक. गल्लीबोळात, चौका चौकात नाक्या नाक्यावर अथवा एखाद्या कार्यालयात दिसला की तो ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखला जायचा. कधीकाळी मुंबई महानगरीच्या रस्त्यावर मराठी अस्मितेचा झेंडा फडकवत हेच शिवसैनिक सत्ताधार्यांचा थरकाप उडवून द्यायचे. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा द्यायचे. सत्तेत कमी असले तरी स्वत:च्या वैचारिक भुमिकेची सत्ता ते कायम राखायचे. त्याचं कारणही तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेली महाराष्ट्र मुलखातील शिवसैनिकांची निष्ठा. ती निष्ठा सहजासहजी निर्माण करता येत नाही. मरायला आणि मारायला उतरणारे शिवसैनिक बाळ ठाकरेंच्या एका आदेशावर मुंबई बंद करायचे ते केवळ ठाकरेंच्या निर्णायक निर्भिड भुमिकेमुळेच.
ठाकरेंचा स्पष्टवक्तेपणा
सर्वस्त्रूत आहे. बाळ ठाकरेंना तो स्पष्टवक्तेपणा कुठल्या पुस्तकातून मिळालेला नव्हता तर बाळ ठाकरे हे स्पष्टवक्तेपणाचे वारसदार होते. तुम्ही आम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा इतिहास पाहितला किंवा प्रबोधनकारांचे पुस्तक आजही वाचले तर त्यातून स्पष्टवक्तेपणा नुसता झिरपताना नव्हे तर थया थया कुस्थितीवर नाचताना दिसेल आणि स्पष्ट म्हणेल सत्य आम्हा म्हणी नव्हे गभाळ्याचे धनी, देतो तिक्ष्ण उत्तरे पुढे व्हावीयाशी बरे। प्रबोधनकारांचे साहित्य तेवढे स्पष्ट, कठोर, आक्रमक, सत्य आणि न्यायवादी असेल तर त्यांचा पुत्र बाळासाहेब ठाकरेही तसेच असतील याचं प्रमाणपत्र देण्याचा आम्हालाच काय कोणालाही अधिकार नाही. ठाकरे बोलायचे आणि एकदा बोलले की ते बोल कायम असायचे. अनेक वादग्रस्त वक्तव्य बाळ ठाकरेंच्या मुखातून महाराष्ट्र मुलखात कडाडले. मात्र ते वक्तव्य कधीही ठाकरेंनी परत घेतले नाही. हाच निडर निर्भिड स्वभाव 80 -90 च्या दशकात उभ्या महाराष्ट्रातील तरुणाला आपलंसं करणारा ठरला आणि शिवसेनेची वज्रमुठ ताकद म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर उभ्या देशात ओळखली जावू लागली. जसे ठाकरेंचे वय होत गेले, शिवसेनेमधील काहींना आपल्या अधिकाराची अभिलाषा वाढत राहिली अन् तिथंच

बंडाचे निशाण
फडकवायला सुरूवात झाली. सर्वात पहिले इ.स. 1991 ला छगन भुजबळांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले. एकटे भुजबळ तेव्हा 17 आमदार घेवून शिवसेनेतून बाहेर पडले. ज्या पक्षाकडे पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती, ज्या पक्षाच्या अभेद किल्ल्याला हात लावण्याची कोणी मजल करत नव्हते त्या अभेद किल्ल्याला छगन भुजबळांनी भेग पाडली ती अंतर्गत नाराजीतून. पुढे भुजबळ काँग्रेसमध्ये गेले, तेथून ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत आले. मंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी सत्तेत राहून राजकारण केले आणि आजही करत आहेत. हे पहिले बंडाचे निशाण शिवसेनेच्या अभेद किल्ल्यासाठी आणि शिवसैनिकासाठी जिव्हारी वार होता आणि त्यावेळी भुजबळ विरूद्ध शिवसैनिक आमने सामने आले. शिवसेना सोडणार्यांना ठाकरेंचे सैनिक माफ करत नाहीत हा एकिकडे संदेश दिला जात असतांनाच दुसरीकडे भुजबळांनीही तेवढ्याच ताकदीने उत्तर देत ठाकरेंशी आम्ही दोन हात करू ही गर्जना केली. पुढे शिवसेना स्वत:ला सावरत असतांना शिवसेनेचे
महत्त्वाचं बुरुज
ढासळलं. भुजबळांच्या बंडानंतर भुजबळ तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रात काम करतायत हे पाहून शिवसेनेमधील अंतर्गत नाराजी, बंडाळी पुन्हा उफळून आली. कोकणात अधिराज्य गाजवणारे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली अन् सेनेचं एक महत्त्वाचं बुरूज पुन्हा ढासळलं, अभेद किल्ल्याला अंतर्गत गटबाजी खिळखिळी करत आहे हे तिथंच स्पष्ट झालं. इथंही शिवसेना विरूद्ध राणे यांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहितला. मुंबई महापालिकेवर अधिराज्य असलेल्या शिवसेनेला तेव्हाच्या महापालिका निवडणूकीत राणेंनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निकाल हा शिवसेनेच्या बाजुने लागला. त्यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना दैनिक यातून एक बातमी प्रकाशित झाली-’बग नार्या मुंबई कुणाची’ याला उत्तर सिंधुदूर्गातून मिळालं. तेव्हा आम्ही आमच्या रिपोर्टर दैनिकातून मुख्य बातमी केली, अजिंक्य जंजिरा राणेंच्या ताब्यात. सांगायचं तात्पर्य शिवसेनेला आतापर्यंत बाहेरून कुणी छेडलं नाही, अंतर्गत गटबाजीतून शिवसेनेचं, शिवसेनेच्या किल्ल्याचं एक एक बुरूज ढासळत गेलं. राणेंपर्यंत बुरूज ढासळंत होतं, नंतर त्यानंतर गणेश नाईक पासून सुरेश नवलेंपर्यंत शिवसेनेचे महत्त्वाचे शिलेदारही बंडाचा निशाण फडकवत शिवसेनेतून बाहेर पडत राहिले. तरीही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात तेवढीच ताठरतेने महाराष्ट्रात राज्य करत राहिली. मात्र आतापर्यंत बुरूज ढासळले, शिलेदारांनी बंड केले, परंतू नंतर जे बंड झाले ते बंड
बाळ ठाकरेंनंतर खुर्ची कुणाची?
या प्रश्नाचं उत्तर उभ्या महाराष्ट्राला देणारं ठरलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या कुटुंबियांना एक संघ ठेवायचे. उद्धव ठाकरे हे फारसे राजकारणात नव्हते परंतू ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे हे परिपुर्ण राजकारणात होते, लहानपणापासून ते शिवसेना प्रमुखांसोबत असायचे. त्यांच्याकडे तेव्हा विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती. शिवसेना वाढत गेली, सत्तेत आली. तेव्हा आता शिवसेनेची खुर्ची कुणाची याकडे साहजिकच सर्वांचे लक्ष वेधले गेले असेल इथेच बाळासाहेबांना पुत्रप्रेम नडलं, शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती देण्याचं ठरलं अन् तेव्हा राज ठाकरेंनी बंड पुकारलं. शिवसेनेतून बाहेर पडणं पसंत केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनतलं हे बंड तेवढंच चर्चेत राहिलं. पुढे महाराष्ट्राचं वादळ म्हणून ज्या बाळासाहेबांकडं पाहितलं गेलं त्यांचं वृद्धापकाळानं दुर्दैवानं निधन झालं. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. अंतर्गत गटबाजी हा शिवसेनेसाठी शाप ठरत राहिला. 1991 पासून ते 2022 पर्यंत शिवसेनेचा इतिहास
पक्षाच्या दोन तुकड्यात
विखूरला गेला. आतापर्यंत पक्ष सावरलेला होता मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2022 साली सर्वात मोठे बंड झाले. ते ठाण्याचे एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेनेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा राजकीय भुकंप ठरला. 40 आमदारांनी केलेल्या उठावामुळे केवळ नेतृत्वालाच आव्हान मिळाले नाही तर पक्षाचे नाव, चिन्ह आणि मोठा जनाधार शिवसेनेच्या हातून गेला. ज्या पक्षाने अनेक दशकापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. त्याच पक्षाला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी न्यायालयीन आणि राजकीय संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे आज पुन्हा उरल्या सुरल्या शित्तसेनेमध्ये
बंडाची भाषा नव्हे
तर बंडाचा निर्णय
पुन्हा झाला. आज शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फुटीच्या उंभरठ्यावर नव्हे तर निर्णायक मार्गावर निघाले. शिवसेनेला फुटीच्या आजपर्यंत जेवढ्या जखमा झाल्या त्या जखमा वेळोवेळी भरून काढण्यात आल्या. शिवसेना अनेकवेळा फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेत राहिली मात्र प्रत्येक वेळा घरातीलच आग शिवसेनेसाठी अधिक धोकादायक ठरली. आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न उभा आहे. शिवसेनेच्या इतिहासातील बंडखोरीचे हे शेवटचे पर्व असेल की भविष्यातही ठाकरे यांच्या राजकीय वारशाला घरातून आव्हान मिळेल.







