बीड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. शैलेश फडसे यांची बदली केली आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४(५) नुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ही बदली करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार, श्री. फडसे यांची सह आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड या रिक्त गट-अ पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यांना दि. १७ जून २०२६ (मध्यान्ह) पासून बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून, त्यांनी दि. १८ जून २०२६ रोजी नव्या पदावर रुजू होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनाला तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने जारी करण्यात आला असून, शासनाचे अवर सचिव ए. के. लक्कास यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.
श्री. शैलेश फडसे यांच्या बदलीमुळे बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी आता कोणाकडे सोपविण्यात येणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.








