
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसिल, पंचायत समिती कार्यालयाच्या भिंती गुटखा, तंबाखूच्या पिचकार्याने रंगल्या
बीड, (रिपोर्टर)ः- शासकीय कार्यालयाला उकीरड्याचे स्वरूप येवू लागले. ज्या कार्यालयातून स्वच्छतेचा संदेश दिला जातो. स्वच्छता अभियान राबविले जाते तेच कार्यालय अस्वच्छ आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल, पंचायत समिती कार्यालयातील भिंती गुटखा, तंबाखू, मावा च्या पिचकार्यामुळे रंगलेल्या आहेत. या भिंती पाहितल्या नंतर असे वाटते की कार्यालय आहे की, एखादा उकीरडा… यावर संबंधित कार्यालयाने योग्य ती भुमिका घ्यायला हवी. कार्यालयात थुंकणार्या विरोधात दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयाची नियोजन विभागाची नवीन इमारत गेल्या काही वर्षापुर्वी बांधण्यात आली.

या कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी थुंकल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर जिल्हापरिषदेची इमारत देखिल नवीनच आहे. या इमारतीचे नवे फिटले नाही तोच जागो जागी काना कोपरे पिचकार्यांनी रंगलेले दिसत आहेत. जिल्हापरिषद कार्यालयातून स्वच्छतेचा संदेश दिला जातो. स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र या कार्यालयात किती स्वच्छता आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहे. तहसिल कार्यालय भलेही अनेक इमारतीमध्ये स्थलांतरित झाले असले तरी त्या ठिकाणीच परिस्थितीही अशीच आहे. बीडपंचायत समितीची इमारतही नवीन असून या इमारतीत देखिल अनेक ठिकाणी थुंकल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात थुंकल्यानंतर दंड आकारला जातो मात्र या कार्यालयात थुंकल्यामुळे किती घान झाली एवढे होवून ही कार्यालय प्रमुख थुंकणार्या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.






