
जिल्हा कारागृहातले अनेक झाडांची कत्तल
एकीकडे जिल्ह्यात वृक्षलागवडीची मोहीम, दुसरीकडे सरकारी कार्यालयातच वृक्षतोड, जिल्हा कारागृह अधिक्षक गायकवाडांवर कारवाई करा
उद्या जिल्हा कारागृहासमोर निदर्शने

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे सांगत हरित बीड अभियानांतर्गत पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात 1 कोटी वृक्षलागवड करण्यास शुभारंभ करण्यात आला. एक दिवसात 20 लाख वृक्ष लागवड झाल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. मात्र त्याच बीड शहरातल्या जिल्हा कारागृहात उभे असलेले मोठमोठे वृक्ष काल जिल्हा कारागृह अधिक्षक गायकवाड यांनी निर्दयीपणे कत्तल केले. कुठलीही परवानगी या महाशयांनी घेतली नाही. तब्बल तीन ट्रक मोठमोठ्या ओंडके लोड केलेले ट्रक भरले होते. जेव्हा हा प्रकार वृक्षप्रेमींच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत आक्षेप घेत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशा स्थितीत एक ट्रक शिवाजीनगर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. परंतु जिल्हा कारागृह अधिक्षकांनी वृक्षतोड करूएन नेमके काय साध्य केले ? ंहा सवाल विचारला जात असून कारागृह अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

बीड जिल्हा न्यायालयाच्या समोर जिल्हाकारागृह आहे. कारागृहाचा परिसर मोठ्या प्रमाणावर असून त्याठिकाणी मोठमोठे झाडे कित्येक वर्षाचे उभे होते. काल अचानक या झाडांची सर्रास कत्तल केली गेली. जिल्हा कारागृह अधिक्षक गायकवाड यांनी सदरचे झाड नेमके का तोडले? याचे उत्तर मिळू शकले नाही. परंतु बीड जिल्ह्यात आधीच वृक्षांची कमी, केवळ अडीचटक्के झाडांचे प्रमाण. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपूर्वी हरित बीड अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा आणि संगोपनाचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात आला. एक दिवसात 30 लाखांपेक्षा जास्त वृक्ष लागवड केल्याचे जिल्हा प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून सांगितले. जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड केली जाणार असल्याचेही मनसुबे आखण्यात आले. मात्र त्याच जिल्ह्यात शासनाच्या कार्यालय परिसरात उभे असलेले मोठमोठे झाडे तोडून जिल्हाकारागृह अधिक्षकांनी शासनाच्याच मोहिमेला हरताळ फासली. काल वृक्षतोड सुरू असताना काही वृक्षप्रेमींनी थेट कारागृह परिसरात जावून याचे व्हिडिओ काढले. हे झाड का तोडले जातात? याचा जाब विचारला. मात्र यावर उत्तर मिळाले नाही. शेवटी शिवाजीनगर पोलिसांनी कारागृहामध्ये लाकडे भरलेला ट्रक आपल्या ताब्यात घेतला. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
कारागृह अधिक्षकांनी फोन कट केला
बीड जिल्हा कारागृह अधिक्षक गायकवाड यांना रिपोर्टरने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वृक्षतोड नेमकी का केली? याबाबत त्यांची प्रतिक्रिया हवी होती, मात्र फोन करताच रिपोर्टरमधून बोलतोय, असं म्हटल्याबरोबर संबंधित अधिक्षक महोदयांनी फोन कट करून आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न केला.
उद्या कारागृहासमोर निदर्शने
कारागृह परिसरामधील अनेक झाडे काल जिल्हा कारागृह अधिक्षक गायकवाड यांच्या आदेशावरून तोडण्यात आल्यानंतर या प्रकरणी वृक्षप्रेमींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना मेलद्वारे तक्रार करून या अनाधिकृत वृक्षतोडी प्रकरणी उद्या जिल्हा कारागृहासमोर निदर्शने करणार असल्याचे म्हटले.







