
कामगार विभागात संचालक म्हणून नियुक्ती
बीड (रिपोर्टर):- बीडचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन शासनाकडून रद्द करण्यात आले असून त्यांना कामगार विमा विभागात संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत डॉ. अशोक थोरात हे आपल्या कामाचा पदभार स्विकारणार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी अधिवेशन काळात त्यांचे निलंबन झाले होते.
केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशन दरम्यान कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा उचलत सदरील गैरव्यवहाराचा ठपका हा बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर ठेवला होता. त्यांच्या तक्रारीवरून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहातच डॉ. थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. या निलंबन कारवाई विरोधात डॉ. थोरात हे मॅट आणि उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, राज्य सरकारने चार महिन्यानंतर डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन रद्द करून त्यांच्यावर संचालक पदाची जबाबदारी टाकली आहे. आता डॉ. थोरात हे राज्य कामगार विमा विभागाचे राज्यात 10 ठिकाणी हॉस्पिटल असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डॉ. थोरात यांच्यावर असणार आहे. डॉ. थोरात हे रुजू होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले असून दुपारनंतर ते आपला कार्यभार स्विकारणार आहेत.








