
गेवराई ,(रिपोर्टर)ः- गेवराई उपविभागीय पोलिस उपअधिक्षक म्हणून अनिल बबन कटके यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता. त्यांच्या आगमनामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः अवैध वाळू वाहतूक रोखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे व सामाजिक सलोखा राखणे या महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
अनिल कटके यांचा पोलिस सेवेतला अनुभव उल्लेखनीय आहे. यापूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काटेकोर तपास, प्रामाणिकपणा व कठोर शिस्त या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणले होते. नागरिकांचा विश्वास संपादन करणे व न्याय देणे हेच त्यांचे ब्रीद राहिले आहे. गेवराईत अलीकडील काळात राजकीय-सामाजिक तणाव तसेच आरक्षणाच्या मुद्द्यांवर घडलेल्या घटनांचा विचार करता, नव्या उपअधिक्षकांकडून नागरिकांना न्याय मिळवून देणे व कायदा सुव्यवस्थेचा धागा घट्ट ठेवणे या बाबतीत विशेष प्रयत्न होतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसह कायद्याचा धाक प्रस्थापित करणे आणि अवैध वाळू वाहतुकीस आळा घालणे ही त्यांच्यासमोरची प्राथमिक आव्हाने आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे गेवराईत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणले जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.








