
गर्भवती महिलेच्या पोटात मेलेलं बाळ सिझरद्वारे काढण्यास टाळाटाळ
इथला स्टाफ कामचुकार, रूग्ण दुरूस्त होण्याअगोदरच दिली जाते सुट्टी
बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्यांच्या कामचुकार आणि उध्दटपणाच्या तक्रारी सातत्याने वाढतांना दिसून येत असून रात्री पोटातच मेलेला गर्भ शिजरद्वारे काढण्यासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णासोबत उपस्थित कर्मचारी, अधिकार्यांनी अत्यंत उध्दटपणाची वागणूक देत हे शिजर येथे होणार नाही म्हणत सुट्टी देवून टाकली. या प्रकरणाची लेखी तक्रार जेव्हा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे देण्यात आली. तेव्हाही येथील व्यवस्थापक त्या तक्रारीला घाबरले नाही. मात्र जेव्हा सर्व बाजूने कर्मचार्यंाच्या उध्दटपणावर तक्रारी आल्या तेव्हा आज सकाळी सदरील महिलेचे शिजर करण्यात आले.
बीडचे जिल्हा रूग्णालय हा दवाखाना नसून उध्दटखाना झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. काल संध्याकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुलतांना शेख ही आर्थिक दृष्ट्या गरीब महिला जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल झाली. सदरची महिला ही गरोदर होती. तिच्या पोटामध्ये असलेले बाळ हे मयत झालेलं होतं. शिजरद्वारे पोटातील बाळ 36 ते 40 तासांच्या आत काढण्यात आले नाही तर त्या महिलेच्या जीवालाही धोका होता. मात्र जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी या रूग्ण महिलेकडे दुर्लक्ष करत येथे शिजर होणार नाही, असं थेट सांगत तुम्ही बाहेर खाजगीमध्ये करून घ्या असे म्हणत होते तर काही जण आज होणार नाही उद्या होईल असं सांगून वेळ निभावून नेत होते.
रात्री 10 ते आज सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 13 तास सदरील गर्भवती महिलेस जिल्हा रूग्णालयाकडून रूग्ण सेवा मिळाली नाही. या प्रकरणाची थेट तक्रार तिच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली. मात्र तेव्हाही तात्काळ त्यावर कार्यवाही झाली नाही. जेव्हा या प्रकरणाचा बोबाटा झाला आणि रूग्णालयाचे प्रशासन मुजोरपणा करत असल्याचे दिसून आले. तेव्हा अखेर आज 11 वाजल्याच्या नंतर त्या महिलेला शिजर करण्यासाठी वार्डामध्ये घेण्यात आले. हा दवाखाना उध्दटखाना झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी तेथील कनिष्ठ, वरिष्ठ, महिला कर्मचार्यांना समज द्यावी अशी मागणी होत आहे.








