
बीड (रिपोर्टर): 65 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला म्हणजे ती अतिवृष्टी झाली. इथे एका दिवसात 198 मि.मी. पावसाची नोंद बीड जिल्ह्यात झाली आहे. पावसाने अक्षरश: सर्व पिके उद्ध्वस्त करून टाकले आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहेत, कापूस झोपला आहे, त्याची वाढ खुंटली, उत्पादन घटले. कांदा उद्ध्वस्त झाला, ऊस अक्षरश: झोपला, अन्य पिकं आणि पाल्याभाज्या सडून गेल्या. ही भयावह स्थिती आहे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतातल्या शेतकर्याची. आता पंचनाम्याचे तुणतुणे वाजवायला नको, कागदपत्रांचे खेळ खेळायला नको, बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, ओल्या दुष्काळातल्या सर्व मदती बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांना सरसकट देऊन टाका, बीड जिल्ह्यातल्या सर्वच आमदार, खासदारांनी ओल्या दुष्काळाची मागणी केली आहे. आता सरकार मायबापाने बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांचे अश्रू खरचं पुसायचे असते तर जिल्हावासियांना सरसकट मदतीची नितांत गरज आहे.

होय, काल आम्ही एक रिल पाहिली, ती यथोयोचित वाटली, एखाद्या शेतकर्याने शेतात गांजा अथवा अफू लावली आणि ती शासन-प्रशासन व्यवस्थेला माहित झाली तर पोलिसांपासून महसूलच्या वरिष्ठ अधिकार्यांची फौज त्या शेतकर्याच्या शेतात जाते. त्या गांज्याची अथवा अफुचे पंचनामे केले जातात. शेतकर्याच्या मुसक्या बांधून त्याला थेट जेलमध्ये टाकलं जातं. गांजा, अफू बाबत जी तत्परता ही व्यवस्था दाखवते तीच तत्परता गेल्या आठवड्याभराच्या कालखंडात शेतकर्यांच्या शेतीची नुकसानीवर का दाखवण्यात आली नाही? हा आमचा थेट सवाल आहे. होय, आम्ही बातमीच करतोय, परंतु जळजळीत सत्य निर्ढावलेल्या व्यवस्थेसमोर मांडतोय. बीड जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार 3 लाख 81 हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त झाल्याचे सांगीतले जाते. खरंतर खरीपाचं क्षेत्र साडेआठ लाख हेक्टर क्षेत्र आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं, मऊ गादीच्या खुर्चीवर एसी कॅबिनमध्ये बसलेल्या प्रशासनाला 3 लाख 81 हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त झाल्याचं कसं कळलं. जिथे की 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला की, अतिवृष्टी होते मग या जिल्ह्यात 198 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद एका-एका मंडळामध्ये झाली. अन्यत्रही हा आकडा कमी-जास्त असू शकतो, परंतु जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला हे सर्वश्रूत आहे.
असे असताना गांजा, अफुबाबत तत्परता दाखवणारी यंत्रणा हे पंचनामे करण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. आम्ही तर म्हणू पंचनाम्याचा झंझाट म्हणण्यापेक्षा नाटकी ढोंग बंद करा, डोळ्यांदेखत शेतकर्यांच्या शेतातलं उभं पिक उद्ध्वस्त झालाय. कांदा पाण्यात सडून गेलाय, ऊस धरणीमातेच्या कुशीत झोपून गेलाय. काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटलेत. जिथं की, फळधारणा होण्याचे दिवस असतात त्या काळात कापूस झोडपून निघाला, तिची वाढ खुंटली. तिच्यामुळे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटणार आहे. अन्य पिके, पाल्याभाज्या, फळबाग यांच्याकडे पाहिलं तर शेतकर्याच्या हृदयाला प्रचंड वेदना होतात, कारण त्याने घामाचं रक्त ओकत या पिकांना सांभाळलेलं असतं. त्यामुळे आता एकच उपाय तो म्हणजे बीड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा. ओल्या दुष्काळातल्या सर्व सुविधा तात्काळ शेतकर्यांना द्या, इथला शेतकरी कायम संघर्षात आहे, संकटात आहे, दारिद्रयात खितपत पडलेला आहे. मायबाप सरकार, कागदी घोडे, पंचनाम्याचे तुणतुणे, नुकसानीचे हेक्टर आडेवारीचे ढोल वाजवणं बंद करा आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकर्यांना सरसकट मदत जाहीर करा.









