
जिल्हाधिकार्यांच्या गावकर्यांना सूचना, मुलांना-युवकांना नदी तलावाच्या परिसरात जावू देवू नका
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पाऊस पडला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिल्ह्यातील सर्व तलाव पुर्णतः भरलेले आहेत. नद्या, नाले वाहत आहेत. अजुनही पाऊस उघडलेला नाही. पाऊस पडल्यानंतर नद्यांना पुर आल्यास त्या परिसरातील गावकर्यांनी पुलाच्या जवळ बॅरिकेट्स, फलक, दोरखंड आदी साहित्य उपलब्ध करून नागरीकांना त्या परिसरात जाण्यास प्रतिबंध करावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. तसेच तलाव आणिनदीच्या परिसरात लहान मुलांना, युवकांना जावू देवू नका असे आवाहन देखिल करण्यात आले.
गेल्या आठ ते दहा दिवसापासून बीड जिल्ह्यासह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले असून तलाव 100 टक्के भरले आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. पाऊस अजुन थांबलेला नाही. नदीला पाणी आल्यानंतर नागरीक पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी त्या त्या गावातील नागरीकांनी पुलाच्या परिसरात ग्रा.पं. निधीतून बॅरिकेट्स, फलक, दोरखंड व इतर साहित्य उपलब्ध करावेत. पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित पुलाजवळ बॅरिकेट्स उभारून वाहतूक रोकण्याची कारवाई करावी तसेच पर्यायमार्ग उपलब्ध असल्यास तो नागरीकांना कळविण्यासाठी स्पष्ट सूचना फलक लावावेत, नागरीकांना धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी सूचना फलक लावावेत, ग्रामपंचायत स्तरावर अपात्कालीन प्रतिसाद पथक सक्रीय ठेवावे, गावातील नागरीकांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी ढोल वाजविणे, ग्राम सभा किंवा मोबाईल ग्रुप यांचा वापर करावा, मुलांना व युवकांना नदी, नाले,धरण परिसरात जाण्यास परवानगी देवू नये यासाठी पालकांनी जागृत रहावे, ग्रामपंचायत कार्यालयातून सतत संबंधित तहसिलदार व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.








