
शेतात, घरात, दारात आणि शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
कलेक्टरला म्हणाले, अतिजलदगतीने पंचनामे करा

बीड/गेवराई (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरुच आहे. रात्री पुन्हा अतिमुसळधार पाऊस झाल्याने जिल्हाभरातल्या नद्या-नाल्यांना पूर आले. गोदावरी, मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा या नद्यांनी अक्षरश: आपलं रौद्ररुप दाखवलं. यामध्ये सिंदफणा नदीने मात्र गेल्या पन्नास वर्षात जे रूप दाखवलं नाही त्यापेक्षा कितीतरी भयानक रूप गेल्या दोन दिवसात ती दाखवत असून सिंदफणा आपल्या नदी पात्रातून एक-एक कि.मी. बाहेरून वाहत आहे त्यामुळे सिंदफणा नदी पात्र काठावरच्या गावात हाहाकार उडवून दिला आहे. आज सकाळी नांदूरहवेली, या गावची ट्रॅक्टरमध्ये बसून ना. गिरीष महाजन यांनी पहाणी केली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत संबंधितांना सूचना केल्या. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आज संध्याकाळी बीड मुक्कामी किंवा उद्या बीड जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाने अक्षरश: शेतात, गावात, घरात नव्हे नव्हे तर शेतकर्यांच्या डोळ्यातही पाणी आणून सोडले आहे.
जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन हे धाराशीवसाठी आले होते, मात्र रात्री त्यांनी बीड मुक्काम केला. आज सकाळी बीड जिल्ह्यातली भयावह परिस्थिती त्यांच्या कानावर गेल्यानंतर बीड नजीक असलेल्या नांदूरहवेली येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची महानांनी ट्रॅक्टरवर प्रवास करून पाहणी आणि आढावा घेतला. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगून शेतातील मातीही वाहून गेली असं म्हणत महाजनांनी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीक गंभीर आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडल्याचे स्पष्ट करत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे अतिजलदगतीने करावेत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. महाजनांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेत जिल्ह्याची माहिती घेतली व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. बीडची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यावर लक्ष ठेवून आहेत. ते आज संध्याकाळी बीड मुक्कामी येण्याची दाट शक्यता आहे.








