
बिकट परिस्थितीसाठी हेलिकॉप्टर तयार
बीडच्या प्रशासनाला पळतं ठेवण्यासाठी दादांची गरज
रात्री दादांमुळेच काही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन
बीड (रिपोर्टर): गेवराईच्या सिंदफणा काठावर अनेक गावांमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात पुण्याच्या एनडीआरएफ पथकाला यश आले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविल्याने बीड जिल्ह्यातल्या नदीकाठच्णया गावांची परिस्थिती अधिक बिकट होण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर असून नाशिकच्या एअर फोर्स बेस्टवर बीडसाठी हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. रात्री तीन वाजेपर्यंत गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित हे फिल्डवर दिसून आले. ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संपर्कात सातत्याने होते. विशेष म्हणजे अजितदादांमुळे रात्रीचे रेस्क्यू झाले हे विशेष. अजितदादांनी प्रशासनाला आधी सर्व लोक सुरक्षित बाहेर काढा, नंतर काय करायचे ते करा हे बजावले.
बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिलेला असताना प्रशासन मात्र तेवढ्याच चपळाईने काम करत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कुठलीही घटना अथवा माहिती अधिकार्यांपर्यंत गेल्यानंतर जोपयर्ंत एखाद्या नेत्याचा अथवा मंत्र्याचा फोन येत नाही तोपर्यंत हे अधिकारी हालत नसल्याचे या चार दिवसातला अनेकांना अनुभव आहे. त्याचा प्रत्यय रात्री आला. सिंदफणा नदीची पातळी कमी होत नाही, अनेक गावांना पाण्याचा वेढा आहे, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पुण्यावरून 26 जवानांची एनडीआरएफची टीम गेवराई मतदारसंघात काम करत आहे. त्याचे नेतृत्व करणारा धर्मेंद्र हा कौतुकास्पद काम करतो, परंतु बीडची एनडीआरएफ टीम ही केवळ फोटोसेशनपुरतीच मर्यादीत असल्याची ओरड जनतेतून येत आहे. अशा स्थितीतही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीडच्या परिस्थिती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आज संध्याकाळी अजितदादा बीड मुक्कामी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.








