
पैठणच्या नाथसागराचे 27 दरवाजे उघडले
दीड लाख क्युसेसने गोदावरी पात्रात पाणी
दोन लाख क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडले जाणार?
माजलगावच्या धरणातून 1 लाख क्युसेसने सिंदफणेत पाणी
बीड/गेवराई/माजलगाव (रिपोर्टर): नाथसागराच्या तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने आणि नाथसागरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने आज नाथसागराचे 27 दरवाजे उघडण्यात आले असून यातून 1 लाख 50 हजार 912 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्राच्या काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 1 लाख क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडल्यानंतर अनेक गावांना धोका निर्माण होतो. हे पाणी 2 लाख क्युसेसपेक्षा अधिक सोडावे लागणार असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे माजलगाव धरणातूनही 11 दरवाजे उघडले असून त्यातून 98 हजार पेक्षा जास्त क्युसेसने पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडले जात आहे. मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. या ठिकाणावरूनही मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडले गेले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेबरोबर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाड्यात या पावसाची तीव्रता अधिक आहे. मराठवाड्यातले सर्व धरणे ओव्हरफुल झाले असून पैठणच्या नाथसागरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने आज या सिझनमधले सर्वात जास्त पाणी गोदावरी पात्रात सोडले गेले आहे. नाथसागराचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले असून दीड लाख क्युसेसने पाणी गोदावरी पात्रात दुपारी बारा वाजता सोडण्यात आले होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने हे पाणी वाढवण्यात येत असून एक वाजेपर्यंत 1 लाख 70 हजार क्युसेसने पाणी सोडले गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गोदाकाठी असणार्या गावांना पुराचा धोका आहे. गोदावरी नदी गेवराई तालुक्यातून जाते. गोदाकाठी बीड जिल्ह्यातले 60 पेक्षा अधिक गावे आहेत. या सर्व गावांना सतर्कता आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 1 लाख क्युसेसने पाणी सोडल्यानंतर काही गावांना त्याचा फटका बसतो मात्र आता दीड लाख क्युसेसने पाणी सोडले गेले असून 2 लाख क्युसेसपर्यंत गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गोदाकाठी सतर्कता अधिक महत्वाची आहे. इकडे माजलगावच्या सिंदफणा धरणाची परिस्थिती तशीच असून त्या धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 1 लाख क्युसेसच्या आसपास जायकवाडी धरणातून सिंदफणेच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. सिंदफणेच्या काठावरच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडलेले असून मांजरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेले आहे.








