
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 48 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आहे त्या शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं.
दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने बीड तालुक्यातील राजुरी, पेडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश, नाळवंडी, कुर्ला, पाली, बीड, पिंपळनेर, चर्हाटा, पारगाव शि, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, दासखेड, थेरला अंमळनेर, आष्टी तालुक्यातील दौलावडगाव, टाकळसिंग, आष्टी, धानोरा, कडा, धामणगाव, पिंपळा, डोईठाण, आष्टी हरिनारायण, दादेगाव, गेवराई तालुक्यातील गेवराई, जातेगाव, पाचेगाव, शिरसदेवी, धोंडराई,तलवाडा, उमापुर, चकलांबा, केज तालुक्यातील हनुमंत, विडा, नांदुरघाट, होळ, धारूर तालुक्यातील धारूर, वडवणी तालुक्यातील वडवणी, कवडगाव, शिरूर कासार तालुक्यातील, शिरूर, रायमोहा, तिंतरवणी, ब्रम्हनाथ येळंब, गोमळवाडा, खालापुरी या 48 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पूर परिस्थितीमुळे अनेकांचे स्थलांतर
बीड जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नद्याचे पाणी वाढल्यास नागरीक अडकून पडू लागले. पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील भिल्ल वस्तीवरील 25 नागरीक पुरपरिस्थितीमुळे स्थलांतरीत करण्यता आले. या नागरीकांना जि.प. शाळेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली तसेच पाटोदा शहरातील 25 नागरीकांना तहसिल कार्यालय सभागृहामध्ये स्थलांतरित करण्यात आले. शिरापुर गात ता.शिरूर येथील नागरीकांनाही पुरपरिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेचे बचाव कार्य करण्यात येत आहे तसेच शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब, डोंगरकिन्ही येथील नागरीकांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान ज्या ज्या ठिकाणी नागरीक अडकून पडलेले आहेत त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे.








