
3 लाख क्युसेसने पाणी सोडले, गोदाकाठी हाहाकार
अनेक गावांत पाणी शिरले, वेळीच स्थलांतर केल्याने अनर्थ टळला

गेवराई (रिपोर्टर): पैठणच्या नाथसागरातून तब्बल 3 लाख क्युसेसपेक्षा अधिक पाणी गोदावरी पात्रात सोडल्यानंतर गोदावरीला महापूर आला. तासी चार ते पाच कि.मी. वेगाने येणारे पाणी रात्री बारा वाजता बीड जिल्ह्याच्या गोदाकाठाला येऊन धडकले. महापुराच्या भीतीने गेवराई तालुक्णयासह माजलगाव तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावांतील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. सायरन वाजलं की गावकर्यांची धाकधूक वाढायची, अख्खी रात्र गोदाकाठच्या गावागावातील नागरिकांनी अक्षरश: जागून काढली. रात्री उशिरा राक्षसभुवन येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. बीड जिल्ह्यातले 62 गाव आणि जालना जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गोदाकाठचे गाव जागते राहिले. अनेक गावांमध्ये पाणी घुसले. आधीच शेती उद्ध्वस्त, पुन्हा या महापुराने गोदाकाठच्या हजारो हेक्टर शेतीमध्ये पाणीच पाणी पहायला मिळत आहे. आता नाथसागरातून पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे. आज सायंकाळपर्यंत गोदावरी पात्रातलं पाणी काहीसं कमी होईल. मात्र सध्याही या भागात पूरपरिस्थिती आहे. अनेक गावातील नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.

काल रात्रीपासून नाथसगरातून तीन लाख क्यूसेस पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान मध्यरात्री शहागडच्या पुलावर मोठा फौज फाटा तैनात होता, गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील जवळपास 60 गोदाकाठच्या गावांनी रात्र जागून काढली, जस जसा पुराचा वेढा वाढत होत तसे भीतीचे वातावरण निर्माण होत होते. गावात क्षणाक्षणाला सायारन वाजवले जात होते, पाणी पातळी सांगितली जात होती काही भागात मध्य रात्री एन डी आर एफ चे पथके तैनात करण्यात आले होते, कुरण पिंपरी पासून ढालेगावपर्यंत प्रशासन सतर्क होते. सकाळी अनेक गावांना पुराने वेढले होते. गावात आता फक्त कर्ते पुरुष राहिले आहेत शनी महाराजांचे संपूर्ण मंदिर तर पाण्यात आहे. तर मंदिरावर असणारे मारोती मंदिर पाण्यात आसून पाणी वेशीच्या आत घुसले आहे. गेवराई तालुक्यातील अनेक गावांना बाहेर पडणारे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गेवराई तालुक्यातील सुमारे 30 ते 35 गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. रात्री प्रशासनाने तातडीने काही नागरिकांचे स्थलांतर केले होते.

यामध्ये सावळेश्वर, पांचाळेश्वर, बोरगाव, गुळज, नागझरी, आगर नांदूर, हिंगणगाव, गोंदी, कटचिंचोली, पांगुळगाव, मिरगाव, काठोडा, राजापूर, गंगावाडी, रामपुरी, गोपत पिंपळगाव, श्रीपत अंतरवाला यासह अनेक गावांचा समावेश होता.
स्थलांतरित नागरिकांची व्यवस्था या खालील ठिकाणी केली होती.
गोदी खुर्द – नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विठ्ठल मंदिर येथे सोय करण्यात आली आहे.
गुळज – भगवाननगर येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था केली.
नागझरी (रेवकी महसूल मंडळ) – नागरिकांना जायकवाडी वसाहतीतील भगवान बाबा माध्यमिक विद्यालयात नेण्यात आले.
सावळेश्वर – जिनिंग येथे लोकांना थांबवले आहे.
संगम जळगाव – नागरिकांना खंडूबाबा माध्यमिक विद्यालय, रेवकी येथे स्थलांतरित.
भोगलगाव, गंगावाडी (राहेरी) – नागरिकांना तलवाडा येथील शाळेत हलवले आहे.
जुने बोरगाव बु. – नागरिकांसाठी बोरगाव जिल्हा परिषद शाळा व बरड बोरगाव शाळा येथे सोय.
हिंगणगाव – सध्या परिस्थिती सामान्य असून 4 ते 5 कुटुंबांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

संगम जळगाव – गावातील गुरेढोरे सुरक्षित स्थळी हलवली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु स्थिती बिकट झाल्यास रेवकी येथील शाळेत अतिरिक्त सोय ठेवण्यात येणार आहे.
प्रशासन सतर्क
पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गावागावात प्रशासन सतर्क असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
गोदाकाठच्या गावांमध्ये वाढत्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासन रात्रंदिवस युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करत असल्याचे दिसत आहे.
सामाजिक भान ठेवून काम करणारी यंत्रणा सक्रिय
गोदाकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने सामाजिक कार्य करणारे डॉक्टर, वकील, पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व्यासपीठावर कार्यरत असलेल्या अनेक संघटना सक्रिय झाल्यात आहेत.
नैसर्गिक आपत्तीत जात, पात, गट, तट, पक्ष भेद विसरून लोक एकत्र तर दोन गटा-तटातला वाद पुरात वाहून गेल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.

नागझरी रस्त्याचे भिजत घोंगडे कायम ; गावकरी आक्रमक
नागझरी येथे रस्ता नसल्यामुळे गावकर्यांना पूर परिस्थितीतून बाहेर काढण्यास मोठे कसरत करावी लागली माननीय कलेक्टर साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागझरी गावच्या रस्त्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याकडे तात्काळ लक्ष देऊन नागझरी गावाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंच शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे.








