
पाटोदा तालुक्यातील जवळपास सर्वच बंधार्यांची दयणीय अवस्था,प्रशासन ढीम्म
पाटोदा ( रिपोर्टर ):- पाटोदा शहरात मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे मांजरा नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे रेणुका माता मंदिर परिसरातील माळावरची देवीजवळ असलेल्या तिरुका शिवार येथील जुन्या बंधार्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
महापुरात वाहून आलेली मोठमोठी झाडे या बंधार्याच्या होलमध्ये अडकली असून त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळा निर्माण होतो आहे. यामुळे पाण्याचा जोरदार दाब वाढून नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसले आहे. स्थानिक शेतकर्यांच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत अनेक झाडे या ठिकाणी अडकली असून त्यामुळे सुमारे 20 ते 25 शेतकर्यांच्या एक हजार फुटांपर्यंतच्या शेतजमिनी जलमय झाल्या आहेत त्याचप्रमाणे बिनवडे वस्ती येथील बंधारा देखील तुंबल्यामुळे राहुल बिनवडे तसेच अनेक जणांच्या शेतीमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे

या भागातील शेतकर्यांच्या दाव्यानुसार हा बंधारा जवळपास 32 वर्षे जुना असून, यातील एक लेन दोन वर्षांपूर्वीच वाहून गेली होती. आता उरलेल्या लेनवरही महापुरात वाहून आलेली झाडे अडकली असल्याने या बंधार्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यापूर्वीच ढगफुटी आणि पावसामुळे शेतकर्यांचे शंभर टक्के पीक नुकसान झाले होते. मात्र आता नदीचे पाणी शेतात घुसल्यामुळे जमीनच खरडून निघत आहे, त्यामुळे शेतकर्यांची चिंता आणखी वाढली आहे.
या संदर्भात पाटोद्याचे तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी माहिती घेतल्यानंतर बंधारा कोणत्या विभागाकडे आहे, हे तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. परंतु जलसंधारण विभागाचे अधिकारी उदमले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही काही प्रतिसाद मिळाला नाही.
यासंदर्भात जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याविषयी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर शेतकर्यांची अडचण कशा पद्धतीने दूर करता येईल, यावर कार्यवाही केली जाईल.
या परिसरात संपत मुळे व रामा राऊत यांच्यासह अनेक शेतकर्यांची शेती नदीकाठावर आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह शेतात शिरल्याने जमीन व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बंधार्याच्या होलमध्ये अडकलेली झाडे तातडीने काढून टाकावीत आणि यासाठी प्रशासनाने आवश्यक यंत्रणा लावून कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी संपत मुळे यांनी केली आहे.
माळावरच्या देवी परिसरातील हा बंधारा नेमका कधी बांधण्यात आला आहे, या बंधार्याला किती पास होल आहेत आणि याची क्षमता नेमकी किती आहे-यासंदर्भात प्रशासनातील कोणतेही अधिकारी ठोसपणे सांगू शकले नाहीत. यावरूनच प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष उघडकीस येत असून अधिकारी व प्रशासनाला या गंभीर बाबींबद्दल किती कमी चिंता आहे, हे समोर आले आहे. या बाबीवरून स्थानिक शेतकर्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.








