
गेवराई (रिपोर्टर):धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना येथे 17 सप्टेंबर 2025 पासून दीपक बोराडे उपोषणाला बसले आहेत. दीर्घकाळ उपोषण सुरू असल्याने त्यांची तब्येत खालावली असून, या बातमीमुळे धनगर समाज बांधव संतापले आणि आक्रमक झाले काल बुधवार रोजी सकाळी उमापूर सर्कल च्या वतिने उमापूर फाटा येथे एक तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
धनगर समाजाची प्रमुख मागणी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची आहे. मेंढपाळ, धनगर, हाटकर हे समाज पारंपारिकपणे भटकंती करणारे आणि आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी समाज गेली अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करत आहे दिपक बोराडे हे जालना येथे उपोषण करीत आहेत 1ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास उमापूर फाटा येथे शेकडो धनगर समाज बांधव राज्य महामार्गावर जमले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला गेवराई शेवगाव मार्गावरील उमापूर फाट्यावर झालेल्या आंदोलनाने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली यावेळी सकळ धनगर समाज उमापूर सर्कलच्या वतीने सपोउप निरिक्षक पानपाटील यांनी प्रशासनाच्या वतिने निवेदन स्विकारले.

लिंबागणेश येथेही चक्काजाम आंदोलन
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जालना येथे पंधरा दिवसांपासून दीपक बोराडे उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहूतक ठप्प झाली होती. या वेळी रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मोरे पाटील, कृष्णा पितळे, बाळासाहेब मुळे, दीपक बोराडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नेकनूर पोलिसांना देण्यात आले.









