
वडवणी (रिपोर्टर):- राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा. तसेच संघर्ष योध्दे दिपक भाऊ बोराडे यांच्या उपोषण सन्मानार्थ आज वडवणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. तर वडवणी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्याचा आज आठवडी बाजार शहरात असतो. या दिवशी अन्य साधारण महत्त्व प्राप्त असते. या दिवसाचे औचित्य साधून वडवणी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करत धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे. गेल्या काही दिवसापासून दीपक बोऱ्हाडे हे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. याचा निषेध म्हणून आज सकाळी 11 वा. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको केला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, देत कसे नाही आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, यासह सरकार विरोधी घोषणा देऊन बीड परळी हायवे दणाणून गेला होता.
तर वडवणी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब चौक ते तहसीलवर बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात माजलगाव मतदार संघाचे नेते मोहन जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दादासाहेब मुंडे, काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे त्यांच्यासह अन्य जणांची उपस्थिती होती. या दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करावा. यासह बळीराजाला सरसकट हेक्टरी 50 हजार अनुदान जाहीर करा, पाऊसात मुत्यू मुखी पडलेल्या गाय, म्हैस, बैल 50 हजार, शेळी ,मेंढी 15 हाजार रुपये, खतांवरील जीएसटी रद्द करावी, पिएम किसानचे अनुदान वंचित शेतकर्यांना देण्यात यावे, पिक विमा तात्काळ देण्यात यावा.या सह मागणीसाठी बैलगाडी मोर्चा वडवणी तहसीलवर काढण्यात आला होता. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष महादेव जमाले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव जिजा आंधळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनायक मुळे, मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष विष्णू मुजमुले यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख घटकाचे तालुकाध्यक्ष, नेते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाला मराठ्यांचा पाठिंबा
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा देखील पाठिंबा आहे. संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील भूमिका स्पष्ट केली आहे याचाच भाग म्हणून वडवणी तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव देखील तन मन आणि धनाने देखील धनगर समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहेत व भविष्यात देखील राहतील असं मत मराठा समाजाच्या वतीने संतोष डावकर यांनी व्यक्त करत पाठिंबा दर्शवला आहे.








