
250 दिवस शांत होतो, अजूनही शिक्षा भोगतोय – धनंजय मुंडे यांचे दसरा मेळाव्यात वक्तव्य
भगवंभक्तीगड (रिपोर्टर): भगवानगडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी भावनिक भाषण करत आपल्या मनातील खंत व्यक्त केली. मी 250 दिवस शांत होतो. माझी बहीण मला आधार देत होती. माझ्या विरोधात मिडिया ट्रायल सुरू होती. कोर्टाने मला क्लीन चिट दिली, तरीही मी शिक्षा भोगतोय, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुंडे पुढे म्हणाले की, त्यांच्या विरोधात खोटे घोटाळे उकरून काढले गेले, कोर्टात खटले दाखल झाले, पण न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले. उलट कोर्टात जाणार्यांनाच लाख रुपयांचा दंड बसला. तरीदेखील ते मानसिकरीत्या शिक्षा भोगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याची परंपरा मोडली नाही
धनंजय मुंडे म्हणाले की, अभूतपूर्व हा दसरा मेळावा मुंडे साहेबांची देणगी आहे. पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे मेळावा होईल की नाही, अशी वेळ आली होती. पण चर्चा करून परंपरा मोडायची नाही, असा निर्णय घेतला गेला. मी आज फक्त आमदार आहे, मात्र माझी बहीण मंत्रीमंडळात आहे. शेतकर्यांसाठी जास्तीत जास्त मदत ताई मिळवून देतील, यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत मोठे विधान
धनंजय मुंडे यांनी आरक्षणाच्या विषयावर भाष्य करताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले याचा आनंद आहे. पण काही जण आरक्षणाच्या आडून ओबीसीमधील हक्क गाठायचा प्रयत्न करत आहेत. हे कुणाला फसवत आहेत? स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे सुरू आहे. सरकारने जेवढं शक्य ते केलं आहे. पण एका ताटातलं काढून दुसर्या ताटात टाकणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

मी बरेच दिवस बोललो नाही
भावनिक होत मुंडे म्हणाले की, मी बरेच दिवस बोललो नाही. खामोश रहेना ठीक. पण आज डोळ्यांत पाणी येतंय. मुंडे साहेबांच्या हाताला धरून भगवानगडावर मेळाव्याला जायचो. साहेब गेल्यानंतर बहिणीने ही परंपरा पुढे चालवली, याचा मला अभिमान आहे.








