
बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उत्स्फूर्तपणे मराठा समाजाने हजेरी लावून दसरा मेळावा न भूतो न भविष्यती केला. कुठलाही गाजावाजा न करता आयोजीत केलेल्या या मेळाव्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याने जो तो आपल्या तोंडात बोट घालत असल्याच्या प्रतिक्रिया एकीकडे व्यक्त होत असताना दुसरीकडे आरक्षण मिळूनही आता थांबायचं नाही, शासन-प्रशासनात आपले टक्के वाढवायचे आहेत. मराठ्यांनी शासक आणि प्रशासक दोन्ही बनले पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी ‘मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, पण लेकरांना आरक्षण मिळाल्याचे पहायचे आहे’, असे सांगत अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी 70 हजार रुपये द्या, एक महिन्याच्या आत शेतकर्यांना मदत द्या, नसता शेतकर्यांसाठी आंदोलन उभारू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून दिला. त्याचबरोबर पिचलेल्या शेतकर्यांना मदत करताना कोणाची जात बघू नका, त्यांना काही ना काही मदत करा, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी या वेळी केले.
आपल्या भाषणात जरांगे पाटील भावूक झाले. ते म्हणाले – मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना आरक्षण मिळालेलं मी बघणार. पण मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. त्यामुळे एकजुटीने राहा. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे.
ते पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर लागू झाल्यानंतर अख्खा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी संघर्ष करून एक कोटी लोकांना आरक्षणात घातले आहे. उरलेल्यांना देखील त्यांचा हक्क मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत
जरांगे पाटलांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले – आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत. हे लोक फक्त टीव्हीवर बोलतात, मोठ्या गाड्यांत फिरतात. पण 40 वर्षांत समाजाला काही दिलं नाही. उलट आपल्यातूनच काही गद्दार पुढे आले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या जातीचं खरं काम प्रशासनातले अधिकारीच करून दाखवतात. सत्ता असो वा नसो, अधिकारी असेल तर खुटा ठोकून ठेवतो. म्हणून आता मराठा समाजाने आपल्या मुला-मुलींना अधिकारी बनवलं पाहिजे.
शासक आणि प्रशासक दोन्ही बना
जरांगे पाटलांनी प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले – प्रशासनात एवढी ताकद आहे की, मोठा नेता असला, गुंड असला तरी त्याला प्रशासनासमोर हात जोडावे लागतात. त्यामुळे मराठ्यांनी अधिकारी बनलं पाहिजे. त्याचबरोबर शासकही बनलं पाहिजे. समाजाला दारिद्र्याचा गंज काढायचा असेल, जातीला संभाळायचं असेल, तर आपण शासक-प्रशासक दोन्ही बनायला हवं.

टंगळमंगळ बंद करा, चतुर व्हा
भविष्यातील लढ्यासाठी त्यांनी समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले. मी आणि माझ्या समाजाने सरकारच्या मुंडक्यावर पाय ठेवून थोडं थोडं मिळवलं आहे. आता पुढे टंगळमंगळ बंद केली पाहिजे. चतुर राहून, डोकं लावून मराठ्यांनी शासक आणि प्रशासक बनलं पाहिजे, असे ते म्हणाले.
या मेळाव्यात जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून मराठा समाजाच्या आगामी वाटचालीचा स्पष्ट आराखडा मांडला – आरक्षण मिळालंय, आता प्रशासनात वर्चस्व मिळवायचं आहे.
पॉईंट टू पॉईंट जरांगे पाटील
मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? असा परखड सवाल मनोज जरांगे (चरपेक्ष गरीरपसश) यांनी विचारला. आमच्या पोराबाळांचा पाणउतार करण्यासाठी, जातीता अपमान करण्यासाठी यांना 30 वर्षे निवडून दिले का? असा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना टोला लगावला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मुंडे बंधूंवर टीका केली.
आपल्याला गुलाम म्हणणार्यांसाठी काम कशाला करता?
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत मनोज जरांगे यांनी त्यावर टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅझेट आहे. मी त्यांना काहीही बोललो नाही. मी बोलायला सुरू केलं तर काय होईल. लोकाच्या लेकराबाळाला तुच्छ समजू नका. गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, आमच्या लेकांना गुलाम समजता काय? अशा लोकांच्या सोबत काम करणारे मराठ्यांच्या पैदाशी कोण कोण आहेत? तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणाले, त्यांचा प्रचार करतो काय? पाच-दहा लाखांसाठी कशाला चाटता? आम्ही जर गुलाम आहोत तर मराठ्यांनो, त्यांच्याकडे कशाला काम करता?
: कशाला कुणाच्या पायाखाली काम करता?
आमचं गुलामीचं गॅझेट आहे तर मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का? मग इंग्रजांनी केलेल्या 1931 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण घेतला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? आम्ही बिघडलेल्या रक्ताचं नाही. तुम्ही तिकडून अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडे निझामाची चाकरी करायला लागला असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही तसं म्हणत नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
आम्ही कुणाला घाबरत नाही. माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे. यांनी आपल्या जातीवर बरंच बोललं, आम्हाला पण सगळं बोलता येतं. पण आता मापात राहा. तुम्ही असं बोलण्यासाठीच मराठ्यांनी तीस वर्षे निवडून दिलं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.
यांना निवडणुकीत खपाखप पाडा
मनोज जरांगे म्हणाले की, हे बदलणारे नाहीत. त्यामुळे दया माया जरा कमी करा. मराठ्यांच्या विरोधात जे कोण उभा राहतील त्यांना खपाखप पाडा. जेव्हा असं होईल त्यावेळी ते मराठ्यांसोबत चांगलं राहतील. तुमच्या लेकरांना गुलाम म्हटलं, मग ते तुमच्या लेकरांपेक्षा मोठे आहेत का?

ओबीसी समाजाला दोष नको
आजपासून कधीच ओबीसी समाजाला दोष द्यायचा नाही. ओबीसींची समाजाचा काही संबंध नाही. याच्यात काही नेते आहेत. सगळ्या माळी समाजाचा दोष आहे का? ते छगन भुजबळ बावचाळले आहे. त्यामुळे काही नेते यामध्ये बोलतात असं मनोज जरांगे म्हणाले.








