बीड (रिपोर्टर) अखंड हिंदुस्थानच्या हुतात्म्यातून प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रथमच बीड जिल्ह्यात पालकमंत्र्याविना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहन झाले. राज्याच्या राजकीय सारिपाठावर अनन्य साधारण महत्व प्राप्त करून घेणार्या बीड जिल्ह्याबाबत गौरदगार काढताना राधाबिनोद शर्मा म्हणाले, जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करून सोडणारा हा बीड जिल्हा आहे. इथे घामाचे रक्त ओकणारे कष्टकरी आहेत. इथे जगाच्या पाठीवर नाव कोरणारे खेळाडू आहेत. इथले समाजकारण अनन्य साधारण आहे. बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेवून चालणारा जिल्हा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याहस्ते झाले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदि मान्यवर उपस्थित होते. बीड जिल्ह्याने भारताच्या स्वतंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिक बीड जिल्ह्यामध्ये आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील अविनाश साबळे यांनी अॅथेलिस्ट या खेळामध्ये रौप्य पदक जिंकून बीड जिल्ह्याची ओळख जगाला करून दिलेली आहे. बीड जिल्ह्यात अनेक खेळाडू, शुरवीर, प्रशासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणा आहेत. बीड जिल्हा शेतकरीही मोठ्या प्रमाणात आपल्या शेतातून उत्पादन करतात. अनेक सामाजिक चळवळी बीड जिल्ह्यात होतात. असा हा बीड जिल्हा जागरूक जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्ये प्रशासनासोबत नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात जागरूकतेने नियम पाळले. त्यामुळे आपण कोरोनासारख्या महाभयंकर साथीला सामोरे जावे लागले. त्यामुळे कोरोनासारखे बीड जिल्ह्याचा मृत्यूदर कमी होता. इथून पुढेही जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही एकजुटीने प्रशासनासोबत काम करावे. असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शालेय पातळीवर ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील चित्रकला, निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकार्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरवण्यात आले. आरोग्य क्षेत्रात आपल्या कामचा ज्यांनी ठसा उमटवला असे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालय आणि बीड येथील केएसके रूग्णालय या दोन रूग्णालयाचा गौरव केला. या मुख्य शासकीय ध्वजारोहनला तहसिलदार सुहास हजारे, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी दयानंद सानप, जिलहा पुरवठा अधिकारी देशमुख महसूल विभागाचे अन्य कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










