मजीद शेख
लोक साखर झोपत असतांना काळाने एका कर्तृत्वाला हिरावून घेतलं. मा.आ.विनायकराव मेटे याचं अपघाती निधन हे कोणालाच न पटणारं आहे. आमचं काल बोलणं झालं, आम्ही कार्यक्रमाला सोबत होतोत असं म्हणत कित्येक लोक मेटे यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त करत आहे. त्याचं मुबंईकडे जाणं अन सकाळी दु:खद वार्ता कानी पडणं हे प्रचंड वेदणा देणारं आहे.
बीडला जणू काही शापच लागला असं झालं. काही वर्षापुर्वी प्रमोद महाजन याचं निधन झालं. महाजन केंद्रातलं प्रभावी नेतृत्व होतं. महाजन यांच्यामुळे बीडकरांची मान उंचावत होती, पण नियतीला हे सहन झालं नाही. त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना ही काळाने बीडकरापासून हिरावून घेतलं. मुंडे हे स्वत:च्या हिंमतीवर उभं राहिलेलं मोठं नेतृत्व होतं. त्यांच्या दु:खातून बीडकर सावरत नाही तोच क्रुर काळाने विनायक मेटे यांच्यावर झडप घातली. कुठलाही राजकीय वारसा नसतांना मेटे यांनी स्वत:च्या बळावर राजकीय क्षेत्रात मजल मारली होती. आज राजकारणात यशस्वी होणं सोपं नाही. सर्वसामान्य माणुस राजकारणात तितका सक्षम उभा राहू शकत नाही. कारण प्रस्थापीत मंडळी राजकारणात दुसर्यांना संधी देण्यास तयार नसतात. नव्वदच्या कार्यकाळात मेटे अंत्यत साधारण होते. मजुरी करुन ते स्वत:ची उपजीवीका भागवत होते. त्यांना समाजकारणाची आवड निर्माण झाली. मराठा महासंघाशी त्यांचा संबंध आला. तेथून त्यांच्या राजकीय आणि सामाजीक कार्याला सुरुवात झाली. 1995 साली राज्यात युतीचं सरकार होतं. या सरकारमध्ये त्यांना विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळाली. या संधीचं त्यांनी सोनं करुन दाखवलं. सलग पाच टर्म ते विधानपरिषदेवर होते. गेल्या महिन्यात त्यांची पाचवी आमदारकी संपली. राजकारण करत असतांना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह आदी पक्षांशी त्यांचा संबंध आला. सत्ता कोणाचीही असू विधीमंडळात मेटे यांच्या शब्दला किमंत होती. त्यांनी आपलं तसं वलयच निर्माण करुन ठेवलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन ते शेवटच्या श्वास पर्यंत लढत राहिले. आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला जातांनाच त्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. मराठा आरक्षणासोबत ओबीसी, मुस्लिम, धनगर आरक्षणाची मागणी सुध्दा ते करत होते. वंचीतांना न्याय द्यावा ही त्यांची प्रमुख भुमिका होती. बीड मतदार संघातून जनतेमधून निवडुन आले नसले तरी बीडच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा हा नेता होता. कधी ही फोन केला की, उपलब्ध असायाचे, त्यामुळे त्यांच्या अवती, भोवती नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी असायची, माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे ही त्यांची भुमिका असायची, बीडपेक्षा राज्यातील विविध जिल्हयात त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. स्वत:च्या हिंमतीवर ते आपला पक्ष पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न करत असे, राजकारणा सोबतच समाजकारणातही त्यांचे मोठे योगदान होते. व्यसनमुक्तीसह इतर कार्यक्रम अवर्जुन घेत होते. सामाजीक सलोखा कायम राहावा अशीच त्यांची अपेक्षा असायची, रमजान ईद नंतर दरवर्षी मुस्लिम बांधवासाठी ईद मिलापचा कार्यक्रम घेत होते. या कार्यक्रमाला सर्वच जाती, धर्माचे लोक मोठ्या संख्येने हजर राहत असे. लोकांच्या सुख, दु:खात सहभागी होत असे. आपला आणि परका असा ते भेदभाव करत नसे. त्यांचा स्वभाव आपलंस करुन घेणारा होता. त्याचं अकाली जाणं हा खुप मोठा आघात आहे. त्यांच्या निधनाने बीडचं आणि चळवळीचं मोठं नुकसान झालं, हे नुकसान भरुन निघणारं नाही. विनायकराव मेटे हे किती मोठेे होेते हे आज बीडकरांना कळलं असेल. मेटे बीडचा बुलंद आवाज होते. हा आवाज आज कायमचा विसावला आहे. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं
2014 साली भाजपा, शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं होतं. युतीमध्ये त्यांचा पक्ष सहभागी होता. त्यांनी बीडमधून निवडणुक लढवली होती. मात्र, त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला होता. पराभव होवून ते डगमगले नाहीत. आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी त्यांना आशा होती, पण ते त्यांना मिळालं नाही. गेल्या काही दिवसापुर्वी राज्यात सत्तांतर झालं. या सत्तांतरात मंत्रीपदाची आस होती, पहिल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांचं नाव आलं नाही. दुसर्या वेळी कदाचीत त्यांचा विचार होऊ शकला असता, पण नियतीला हे मंजूर नसावं. त्याचं अकाली निधन झालं. त्यांचं मंत्रीपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
अशक्य ते शक्य करुन दाखवलं
एकदा आमदारकी मिळाली की, दुसर्यांदा मिळणं ही खुप दुर्मिळ बाब आहे, मात्र मेटे यांच्या बाबतीत वेगळं होतं. त्यांनी पाच वेळा आमदारकी कायम ठेवून दाखवली. आजचं राजकारण हे ठरावीका भोवती फिरत आहे. बड्या प्रस्थांना जे जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं. ज्या, ज्या वेळी मेटे आमदार होत होते. त्या वेळी, पुढारी आणि लोक म्हणायचे हे मेटेंना कसं काय जमतं बुवा. शेवटपर्यंत राजकारणात त्यांनी स्वत:चं वलय शाबुत ठेवलं होतं. त्यांच्या राजकारणाची राज्यात चर्चा होत होती. छोटा पक्ष असतांना ते मोठ्या पक्षांच्या नेत्यांना भीडण्याचं काम करत होते, म्हणुनच मेटेंचा राज्याच्या राजकारणात दरारा होता.










