
लिंबागणेशकरांची निदर्शने
लिंबागणेश (रिपोर्टर): सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. वकील राकेश किशोर यांनी सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा देत सरन्यायाधीशांकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयातील सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने हस्तक्षेप करत हल्ल्याचा प्रयत्न विफल केला. आरोपी वकिलाला तात्काळ न्यायालयाबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धारासंबंधीच्या याचिकेवर तसेच काही धार्मिक संदर्भातील निकालांमध्ये सनातन धर्माचा अपमान केला, असा त्यांचा आरोप आहे.त्यांनी ही कृती दैवी प्रेरणेने केल्याचा दावा केला असून, त्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे.या घटनेचा न्यायालयीन, विधिज्ञ, राजकीय तसेच सामाजिक स्तरावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने आरोपी वकिलावर तात्काळ निलंबनाची कारवाई केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुनावणीदरम्यान उपस्थित वकिलांना शांततेचे आवाहन करत म्हटले, या प्रकारांकडे दुर्लक्ष करा; मला याचा परिणाम होत नाही.
लिंबागणेशमध्ये निषेध
या घटनेचा निषेध म्हणून लिंबागणेश गावात मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. निदर्शनांचे नेतृत्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले.
या प्रसंगी सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ गिरे, बाळकृष्ण थोरात, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष अरुण निर्मळ, तसेच औदुंबर नाईकवाडे, अमोल निर्मळ, उमेश थोरात, बालाजी निर्मळ, माजी उपसरपंच शंकर वाणी, तुकाराम गायकवाड, केशव गिरे, नाना निर्मळ, सुरेश निर्मळ, बाळू थोरात, श्रीराम गायकवाड, दादा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. निदर्शकांनी न्यायसंस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असे सांगत या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.








