
बीड पोलिसांची शिताफी; सोन्याचा ऐवज आणि मोबाईल जप्त
बीड, दि. 9 ऑक्टोबर: बीड शहरातील स्वराज्य नगर येथे 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश शिवाजीनगर पोलिसांनी केल्याने परिसरात दिलासा निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रथमेश किसन जाधव (वय 20, रा. पंचशील नगर, बीड) यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12:30 ते पहाटे 4:00 या दरम्यान, बीड शहरातील स्वराज्य नगर येथील आकाश नवनाथ कातांगडे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचा ऐवज व मोबाईल फोन चोरून नेले होते. घटनेनंतर तक्रार दाखल होताच शिवाजीनगर पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत अखेर प्रथमेश जाधव या चोरट्यास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सखोल चौकशी व तांत्रिक पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा भांडाफोड केला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. हा आरोपी अभिलेखावरील गुन्हेगार असून, यापूर्वी देखील त्याने शिवाजीनगर व बीड शहर हद्दीत अनेक घरफोड्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईचे नेतृत्व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार यांनी केले. या पथकात सपोनि गजाजन क्षिरसागर, पो.ह.वा. (1664) रवी आघाव, पो.ना. (470) ज्ञानेश्वर मराडे, पो.शि. (617) अशोक राडकर, पो.शि. (2077) बाळु रहाडे, पो.शि. (305) दिलीप राठोड, आणि पो.शि. (485) विलास कांदे यांनी मोलाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे बीड शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी दाखवलेली दक्षता आणि व्यावसायिकता याबद्दल नागरिकांकडून तसेच वरिष्ठ अधिकार्यांकडून या पथकाचे कौतुक होत आहे.








