
मारहाणीत महिलेचा कान तुटला, वृध्दाच्या डोक्यात दगड
तीन तोळ्यासह 13 हजारांची रोकड पळवली, परिसरात भितीचे वातावरण
आष्टी(रिपोर्टर)ः-बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या आष्टी तालुक्यातील नागरीकांमध्ये आता चोरट्यांची दहशत निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून रात्री अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरणविहरा येथे दोन वयोवृध्द शेतकरी दांम्पत्याला चोरट्यांनी मारहाण करून तब्बल तीन तोळे सोने व 13 हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली. यावेळी चोरट्यांच्या मारहाणीत महिलेचा कान तुटला तर दुसर्या वृध्द डोक्यात दगड मारल्याने जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंभारो पोलीस ठाण्याचे पोलीसनिरिक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. फिंगर प्रिंट स्कॉड, डॉग स्कॉड, फॉरेन्सीक सायन्स लॅबॉरेटरी स्कॉडयांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील अरणविहरा येथे बुधवारी मध्यरात्री दोन वृद्ध शेतकरी दांम्पत्यांवर चोरट्यांनी हल्ला चढवून अमानुष मारहाण केली. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवून पोबारा केला. या घटनेत महिलेचा कान तुटला असून वृद्धाच्या डोक्यात दगड मारल्याने गंभीर दुखापत झाली आहे.अरणविहरा येथील नवनाथ जाधव आणि रावसाहेब जाधव या दोन्ही शेतकर्यांची घरे एकमेकांपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत. दोन्ही कुटुंबीय नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपलेले असताना सुमारे मध्यरात्री 2 वाजता अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
घरात घुसताच चोरट्यांनी सोने द्या नाहीतर प्राण घेतो अशी धमकी देत वृद्धांना घाबरवले. विरोध करताच, चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.महिलेच्या कानातील दागिने खेचताना तिचा कान तुटला आणि नाकालाही गंभीर इजा झाली. वृद्ध पुरुषाच्या डोक्यात दगड मारल्याने मोठी जखम झाली आहे.
चोरट्यांनी घरातून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने आणि 13 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फिंगर प्रिंट स्कॉड, डॉग स्कॉड, आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पथकाला पाचारण केले.
यावेळी पोलिस कर्मचारी शिवदास केदार, अमोल शिरसाट, मनोजकुमार खंडागळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन सखोल तपास सुरू केला. स्कॉड पथकांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे.
नागरिकांत भीतीचे वातावरण
अरणविहरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिक भयभीत होते. रात्री कोणीही घराबाहेर पडत नव्हते. अशातच या चोरट्यांच्या धाडसी मारहाणीमुळे नागरिकांमध्ये दुहेरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या नंतर चोरट्यांची दहशत
पोलिसांनी गस्त वाढवावी
बिबट्याच्या दहशतीमुळेच लोक घराबाहेर पडत नाहीत. अशातच मध्यरात्री आमच्या गावातील दोन वृद्धांना चोरट्यांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.पोलिसांनी तात्काळ गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आम्ही केली आहे.
– अण्णासाहेब शिरसाट
सरपंच, अरणविहरा








