
कर्जबाजारी शेतकर्याने गळफास घेतला
आत्महत्या करण्यापुर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तालुक्यातील राक्षसभुवन येथील एका कर्जबाजारी शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्याकरण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. चिठ्ठीमध्ये कर्ज असल्याचा उल्लेख आहे. त्याच बरोबर माझ्या मुलांना सांभाळा असे ही चिठ्ठीमध्ये मयत शेतकर्यांनी उल्लेख केलेला आहे.
महादेव तुकाराम राऊत (वय 42 रा.राक्षसभुवन) या शेतकर्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. आत्महत्या करण्यापुर्वी शेतकर्यांने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये आपल्याकडे कर्ज असल्याचा उल्लेख आहे.गंगासागर तु मला माफ कर…संसार उघड्यावर टाकून मी चाललो आहे. माझ्या मुलांचा सांभाळ कर…. अशा पध्दतीचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये आढळून आला आहे. या शेतकर्यांला दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. सदरील शेतकर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला आहे.








